५ ऑगस्ट पासून लॉक डाऊनमध्ये अधिक सवलत देण्याचा निर्णय राज्य व केंद्र सरकारने घेतला आहे.गेली चार महिने लॉक डाऊनमध्ये असलेल्या सर्वसामान्यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा असला तरी तो राबवताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे काराण १ जून पासून टप्प्याटप्प्याने लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला. लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने लॉक डाऊन शिथिल केले. लॉक डाऊन शिथिल होताच तीन महिने घरात बसलेले लोक घराच्या बाहेर पडू लागले, गर्दी करू लागली त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात कोरोनाला थोपवण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले होते पण लॉक डाऊन शिथिल झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. मागील दोन महिन्यात देशात १६ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी २० लाखांचा आकडा पार केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यदर जरी कमी असला तरी कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. देशात दररोज ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाने आता ग्रामीण भागालाही घेरले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या थोपवणे स्थानिक प्रशासनाला अशक्य झाले आहे. ५ ऑगस्टपासून दुकाने, शॉपिंग मॉल, हॉटेल, जिम यांच्यावरील बंदी उठणार आहे. ही सर्व ठिकाणे गर्दीची आहे. विशेष म्हणजे सध्या सणांचा हंगाम देखील आहे. श्रावण, भाद्रपद या महिन्यात अनेक सण येतात. २२ ऑगस्टपासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे.आपल्याकडे गौरी, गणपती हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळ हा मोठ्या आव्हानाचा ठरणार आहे. या काळात देशातील कोरोनाबधितांचा आकडा खूप वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.कोरोनाला रोखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर जनतेचीही आहे. कोरोनाची वाढत जाणारी साखळी तोडायची असेल तर जनतेला प्रशासनास सहकार्य करावेच लागेल. कोरोनाची लस कधी येईल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कोरोना लस येईल तेंव्हा येईल सध्यस्थितील स्वयंशिस्त पाळणे हीच कोरोनावरील लस असे समजून जनतेने प्राशसनास पूर्ण सहकार्य करावे. जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, गर्दी करू नये, सामाजिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटायजरचा नियमित वापर करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींचे जनतेने पालन करुन जनता प्रशासनास सहकार्य करू शकते.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५
Be First to Comment