ग्रामीण भागातील नागरिकांना मिळत आहे रोजगार
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे, ( नंदकुमार मरवडे )
पाऊस सुरू झाल्या पासून जंगल भागात मिळणाऱ्या रानटी भाज्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागल्या.आता श्रावण महिना सुरू झाल्यापासून
गावागावात पिकविल्या जाणा-या गावठी भाज्यांचीही आवक रोहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
गावातील परस बागेत तसेच शेतीच्या बांधावर पिकविल्या जाणा-या या भाज्या ताज्या तसेच रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केला जात असल्याने शहरी भागातील रहिवासी वर्गाला चांगल्या पसंतीस पडत आहेत . साधारणतः रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर या भज्यांच्या बियांची लागवड ग्रामीण भागातील शेतकरी आपापल्या परसबागेत, शेताच्या बांधावर तसेच मोकळ्या जागेत तर वरकस भागामध्ये माळरानावर व डोंगर उतारावर या भाज्या पिकवतात तर आदिवासी समाजबांधव देखील डोंगराळ भागात दळी तयार करून या भाज्यांची निर्मिती करतात. यामध्ये सर्वसाधारपणे वांगी,मिरची भेंडी,शिराळा, घोसाळे, कारळे, काकडी, दुधी, भोपळा,माठ,आळूची पाने आदी भाज्यांचा समावेश असतो.जास्तीत जास्त सेन्द्रीय खताचा वापर केल्याने या भाज्या प्रदूषणमुक्त व आरोग्यास हितकारक असल्याने ग्राहक वर्गाच्या चांगल्याच पसंतीस पडतात.
ग्रामीण भागातून व वरकस भागातून मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रेते थेट शहराकडे विक्रीसाठी घेऊन येत असल्याने शहरातील नागरिक तसेच बाजारहाटासाठी येणा-या नागरिकांना एकाच जागेवर सर्व भाज्या मिळत असल्याने सोईस्कर वाटतात. सध्या उपवासाचे
दिवस असल्याने या भाज्यांना चांगली मागणी मिळत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनाही चांगला रोजगार मिळत असल्याने चार पैसे हाताला मिळत आहेत.






Be First to Comment