अनेकांच्या घरात पावसाचे पाणी : उरण अंधारात
सिटी बेल लाइव्ह / उरण(घनश्याम कडू)
गेले दोन दिवसांपासून पावसाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने उरणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर गेली २ दिवस उरणकर विजेचे विना अंधारात चाचपडत जगत आहेत. जरी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याला सर्वस्वी नगरपालिकेची व सिडकोचे अधिकारी व ठेकेदार वर्ग फक्त नालेसफाईची कामे काढून ती न करताच बिले घेत असल्यानेच ही परिस्थिती उदभवल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.
उरणकरांन पावसाने गेले दोन दिवस पूर्णपणे झोडपले असून अनेक गावांमध्ये घरांत पाणी शिरले आहे. पावसामुळे रस्ते बंद पडले असून जवळपास
निम्म्याहून अधिक विद्यूत जनित्रे बिघडल्याने येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अनेक गावांत पाड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी चढले आहे, तर काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. रस्त्यांची वाहून गेलेली माती शेतकऱ्याच्या शेतात गेल्याने रोपणी झालेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उरणमधील शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या सामानसुमानाची पूर्ती वाट लागली असून कुठे आणि कसं रहायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषदेने व सिडकोने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गटारे साफ न केल्यामुळे गटारी तुंबल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
अशी परिस्थितीचा सामना उरणच्या जनतेला दरवर्षी करावा लागत असतानाही याची योग्यती खबरदारी शासकीय प्रशासन घेताना दिसत नाही. फक्त भ्रष्टाचार करून आपली मालमत्ता वाढविणे हाच एककलमी कार्यक्रम येथील येणाऱ्या अधिकारी वर्गाचा असतो. या अधिकारी वर्गाच्या मालमत्तेची चौकशी केली तर नक्कीच त्यांचा भ्रष्टाचार उघड होईल त्यांना येथील जनता जगो नाहीतर मरो याचे सोयरसुतक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया आम जनता देताना दिसते.
आज दोन दिवसांपासून पावसाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. मात्र यासाठी असणारी आपत्कालीन व्यवस्था कुठे कागदी घोडे नाचविण्यात तसेच राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळीही आता कुठे आहेत हे दिसत नसल्याची खंत जनतेच्या तोडून व्यक्त होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उरणच्या जनतेला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.






Be First to Comment