Press "Enter" to skip to content

चौपदरीकरणामुळे दरडी कोसळण्याच्या शक्यतेने स्थलांतर

कशेडी घाटातील दरडीच्या काळछायेखाली-धामणदेवी गावातील ग्रामस्थ अन् घरं ‘श्रीराम’भरोसे

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये 9 व 10जुलै रोजी मोठया प्रमाणात डोंगरातून दरडी कोसळू लागल्यानंतर गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दरडीच्या काळछायेखाली असलेल्या धामणदेवी ग्रामस्थांना श्रीराम मंदिरामध्ये हलविण्यात आले आहे. चौपदरीकरणामध्ये जमिनीस घरांच्या भूसंपादनाची मागणी करणाऱ्या धामणदेवी ग्रामस्थांना प्रशासनाने सद्यस्थितीत ‘श्रीराम’भरोसे केले असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गाव दरीच्या डोंगर उतारावर वसलेले आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षात या गावावर कधीही दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला नव्हता. महामार्गालगत लोकवस्ती आणि लोकवस्तीनंतर ग्रामस्थांच्या शेतजमिनी अशी भौगोलिक रचना असलेल्या या गावात पुरस्थिती आणि दरडी कोसळण्याचा प्रसंग कधीही उदभवला नव्हता. गेल्या काही वर्षापासून गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतल्यानंतर डोंगराच्या बाजूला मोठया प्रमाणात ब्लास्टींग करून डोंगर उभा कापण्यात आला. यामुळे डोंगराची लाल माती सैल होऊन गेल्या वर्षापासून ठिकठिकाणी दरडी आणि लाल मातीचे ढिगारे कोसळण्यास सुरवात झाली. मात्र धामणदेवी गावाच्या वरच्या बाजूच्या डोंगरांमध्ये चौपदरीकरणाच्या कामामुळे एल ऍंड टी या ठेकेदार कंपनीने मोठया प्रमाणात उत्खनन केले त्यामुळे हा डोंगर धोकादायक बनला आणि 9 व 10 जुलै रोजी मोठया प्रमाणात डोंगरातून द्यावी आणि लाल मातीचे ढिगारे राष्ट्रीय महामार्गावर येऊन कोसळले आणि तब्बल 22 तास वाहतूक ठप्प राहिली.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि दरड हटवण्याच्या महामार्गालगतच्या दरीमध्ये असलेल्या शेतजमिनीत लाल माती जेसीबीने टाकल्याने शेतीचे झालेले नुकसान भरून देण्याची मागणी केली. यानंतर कशेडी घाटातील धामणदेवी या दरडप्रवण क्षेत्रामध्ये रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता बामणे आणि महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासोबत भेट देऊन पाहणी केली. स्थानिक महिला कार्यकर्त्या क्षमता बांद्रे यांनी यावेळी धामणदेवी शेतकऱ्यांच्या जमिनीचे आणि पिकाचे झालेले नुकसान तसेच चौपदरीकरणाच्या कामामुळे दरडी कोसळून दहा घरांतील ग्रामस्थांना कायमचे दरडीच्या धोक्याखाली जगावे लागणार असल्याने चौपदरीकरण मध्ये या घराचे भूसंपादन करून योग्य मोबदला देऊन ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याची मागणी केली. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी प्रांताधिकारी इनामदार यांच्याकडे नुकसान भरपाई देण्यासोबतच दरड प्रवण क्षेत्रामध्ये 24 तास सतर्कता बाळगून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासह धामणदेवी येथील ग्रामस्थांच्या जीविताची काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. येत्या 16 ऑॅगस्ट रोजी या संदर्भात विशेष बैठक घेऊन सर्व संबंधितांनी अहवाल सादर करावा असेही खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितले.

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यात सर्व जलमय परिस्थिती होत असताना धामणदेवी येथे दरड कोसळण्याच्या शक्यतेने पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई आणि महसूल विभागाचे अव्वल कारकून सिनकर, तलाठी श्रीमती खेदू यांनी दरड प्रवण क्षेत्रामध्ये जाऊन संभाव्य धोक्याची पहाणी केली. यावेळी धामणदेवी ग्रामस्थांना कोणत्याही क्षणी डोंगरातून दरडी कोसळून नैसर्गिक आपत्ती संपवण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली आणि भेट देऊन त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहनही केले. लेखी नोटीस मध्ये संभाव्य हानीची जवाबदारी ग्रामस्थांवर राहील असे नमूद केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीयुक्त संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. खासदार तटकरे यांच्याकडे चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्याची मागणी करणाऱ्या धामणदेवी ग्रामस्थांना स्वत:च्या जबाबदारीवर घरे सोडण्याच्या नोटीशीला प्रतिसाद देण्याची इच्छा दिसून आली नव्हती. मात्र, दिवसभरातील पावसाचा जोर पाहून सरपंच शांताराम पारदूले आणि ग्रामस्थांनी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन धामणदेवी येथील श्रीराम मंदिरामध्ये मंगळवारी रात्री राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरातील ग्रामस्थांचा मुक्काम हलविला.

बुधवारी अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळयाची जय्यत तयारी सुरू असताना पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी या खेडेगावातील ग्रामस्थांना मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुळे गड कोसळण्याचा धोका निर्माण होऊन श्रीराम मंदिरात मुक्काम हलवून आप आपल्या घरांची जबाबदारी रामभरोसे सोडावी लागण्याची वेळ ओढवली. ग्रामस्थांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीस चौपदरीकरणासाठी घरे संपादित करून योग्य मोबदला दिल्यास स्थलांतर करण्यास अनुकूल असल्याचे सांगितले.

दरम्यान पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सकाळी 197 मी.मी. आणि बुधवारी सकाळी 207 मी.मी.पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील सावित्री, घोडवनी, ढवळी, कामथी आणि चोळई या पाचही नद्या तुडूंब भरून वाहू लागल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.