Press "Enter" to skip to content

‘विठू माऊली माझी’ अभंगवाणी कार्यक्रम रसिक तल्लीन

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

असा कसा  देवाचा देव बाई ठकडा।
एका पायाने लंगडा।
या संत एकनाथांच्या गवळणीसह संत तुकडोजी महाराज, संत जनाबाई, संत नामदेव, संत कबीर यांच्या दोह्याच्या सादरीकरणाने आज बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमात श्रोते भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त  बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे यंदाचे 23 वे वर्ष आहे. पंडित रघुनंदन खंडाळकर, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर यांनी विविध अभंग सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. तर पांडुरंग पवार, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अनिल भुजबळ, रोहित कुलकर्णी यांनी त्यांना साथसंगत केली. प्रसिद्ध उद्योजक विठ्ठलशेठ माणियार श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.

  ‘जय जय रामकृष्ण हरी’ च्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाला सुरूवात झाली. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. 

शुभम खंडाळकर यांनी संत तुकडोजी महाराजांचा ‘माझी विठ्ठल रखुमाई’, ‘विठु माऊली तू, माऊली जगाची’ हे अभंग सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यानंतर सुरंजन खंडाळकर यांनी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवाभावे।‘ संत नामदेवांचा ‘काळ देहाचे काय, देह आला खाऊं।‘ हे अभंग सादर केले. पंडित रघुनंदन खंडाळकर यांनी ‘माय बापा पंढरीनाथा, भेटी नाही पंढरीनाथा, जीव तळमळी पंढरीनाथा’ ही रचना सादर केली. तिघांनी एकत्रितपणे सादर केलेल्या ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा, एका पायाने लंगडा’ या संत एकनाथांच्या गवळणीला श्रोत्यांनी इतकी भरभरून दाद दिली की श्रोतेही त्यांच्या मागोमाग गायला लागले.   

पंडित रघुनंदन यांनी सादर केलेल्या संत कबीर यांचा ‘सब पैसे के भाई’ या दोहयाला उपस्थित रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.