गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव सण काही दिवसांवर आला असतांनाच मुंबई-गोवा महामार्गावर मोठमोठया खड्ड्यांची दहशत अद्याप कायम आहे. महामार्गावरील बहुतांश ठिकाणच्या रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे भयानक झाली आहे. महामार्गावर काही ठिकाणचे खड्डे सध्या थातुर-मातूर पद्धतीने भरले जात असल्याने या खड्ड्यांची अवस्था लगेचच जैसे थे होत आहे. हे खड्डे चांगल्या पद्धतीने न भरल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लवकरच कोकणात निघणाऱ्या चाकरमान्यांना या खड्ड्यांचे विघ्न पार करावे लागणार आहे. त्यातच सध्या पावसाने जोर पकडला असल्याने महामार्गाचे ठेकेदार कंपनी हे खड्डे कसे भरणार ? तसेच भरलेच तर पावसात ते कसे टिकणार असे अनेक प्रश्न असल्याने गणेश भक्तांना या खड्ड्यांचे विघ्न पार करुन जावे लागणार आहे.
पेण व हमरापूर ही ठिकाणे सुबक व रेखीव गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असल्याने तेथूनच गणेश मूर्ती आणण्यासाठी मोठ्या संख्येतील गणेश भक्तांचा कल असतो. नागोठणे, कोलाड व रोहा परिसरातील अनेक गणेश भक्त दरवर्षी पेण, हमरापूरला गणेश मूर्ती आणण्यासाठी जात असतात. त्यांनाही महामार्गावरील या खड्ड्यांचा त्रास यावर्षी सहन करावा लागणार आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे गणेश मूर्ती आणतांना मूर्तीची तोड फोड झाल्यास गणेश भक्तांच्या भावना देखील दुखावल्या जाणार आहेत.
त्यामुळेच रस्त्याच्या अवस्थेबाबत सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना जाब विचारला पाहिजे पण असे होताना दिसून येत नाही. कित्येक वर्षा पासून महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरु होते. परंतु आता कामाची गती वाढली असली तरी काम निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येत आहे. इंदापुर ते पनवेल पर्यंतचा रस्त्यावर मे महिन्यात डांबर न टाकता थेट कारपेट टाकल्यामुळेच पावसाळ्यात रस्त्याची दैना उडालेली आहे असा आरोप वाहन चालकांतून होत आहे. या महामार्गावर सतत अपघात होत असतात. अपघातात आत्तापर्यंत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. सन २०११ पासून महामार्गाचे काम चालू आहे. सन २०११ पासून कित्येक लोक अपघातामध्ये मरण पावले आहेत. त्याचे मोजमाप करु शकत नाही. भविष्यात यापुढे अपघात झाले तर त्याची पूर्णतः जबाबदारी ठेकेदाराची राहील. त्यामुळेच गणेशोत्सव सणानिमित्त विविध ठिकाणावरुण कोकण वासीय मोठ्या संख्येने कोकणात येणार असल्याने त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ठेकेदाराने प्रामाणिकपणे लक्ष घातले पाहिजे अशी मागणीही वाहनचालकांंकडून वारंवार करण्यात येत आहे.
" गेल्या दहा वर्षांपासून आम्ही खूप सहन केले आहे, यापुढे करणार नाहीत. त्यामुळे येत्या आठ दिवसात जास्तीत जास्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरून महामार्गाची दुरूस्ती करुन तो सुस्थितीत आणावा अन्यथा वाहनचालकांना व परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन छेडण्यात येईल व त्यामुळे होणाऱ्या पुढील परिणामास ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते जबाबदार राहील "
- किशोरभाई म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते व भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष






Be First to Comment