Press "Enter" to skip to content

माजी मुख्याध्यापक सदाशिव आपटे सर यांना श्रद्धांजली

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

खालापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सदाशिव आपटे सर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना संस्थेतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी केएमसी महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. श्रद्धांजली वाहताना आपटे सर यांच्या अनेक हृदय आठवणी सांगताना ,अनेक वक्त्यांना अश्रू अनावर झाले.

सन १९६५ च्या दरम्यान आपटे सर शिक्षक म्हणून जनता विद्यालयात रुजू झाले, १९७१ ला संस्थेने मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी त्यांच्यावर टाकली, त्यानंतर १९८८ साली निवृत्त झाले. अत्यंत शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती होती.प्रारंभी माजी मुख्याध्यापक सरोदे सर, यांनी आपटे सर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

शिक्षण क्षेत्रातील शिक्षक प्रकाश राजोपाध्ये सर, सरोदे सर, गायकवाड सर ,ब्राह्मण सभा अध्यक्ष अनिल रानडे, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख ,ज्येष्ठ पत्रकार सुनील भालेराव, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष उल्हासराव देशमुख तसेच माजी नगराध्यक्ष व संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनी आपटे सर यांना श्रद्धांजली वाहिली. सर्व वक्त्यांनी आपटेसर यांनी संस्थेविषयी दिलेल्या प्रामाणिक योगदान दानाबाबत अनेक आठवणींना उजाळा दिला. असा मुख्याध्यापक आता होणे नाही अशा शब्दात माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनीही आपटे सर यांच्या अनेक आठवणी आपल्या शब्दात सांगितल्या.

संस्थेचे माजी अध्यक्ष उल्हास देशमुख यांनी तर आपले पितासमान छत्र हरवल्याचे सांगताना त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपटे सरांनी संस्थेला भरभराटीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला ,अनेक आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तर, उपस्थितांमध्येही अनेकांचा कंठ दाटून आला होता. या शोकसभेचे सूत्रसंचालन रवींद्र घोडके सर यांनी केले.

या शोकसभेला संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, आपटे सर यांचे चिरंजीव अजित आपटे, स्नुषा सीमा आपटे, संस्थेचे सचिव किशोर पाटील, कार्यकारणी सदस्य दिलिप पोरवाल, विजय चुरी, गुरव, जनता विद्यालय व केएमसी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.