सांगवी येथील फार्महाऊस वरील मटक्याच्या अड्ड्यावर धाड
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत तालुक्यातील सांगवी गावाजवळ असलेल्या सनझारा फार्महाऊसवर सर्रास कल्याण मटक्याचा जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी धाड टाकून मटक्याच्या व्यवसायाला लागणारे साहित्य जप्त केले व नऊ जणांवर कारवाई केली. यामध्ये मुंबई सह गुजराथ, राजस्थानच्या व्यक्तींचा समावेश आहे. ही कारवाई केली परंतु फार्महाऊस आणि फार्महाऊस च्या मालकावर का कारवाई केली नाही ? याची चर्चा तालुक्यात उघडपणे होत आहे.
कर्जत शहरापासून सहा – सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जत – कोंडीवडे रस्त्यावरील सांगवी गावानजीक अब्बास शेख यांचा सनझारा फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सर्रासपणे कल्याण जुगार मटका चालत होता. या फार्म हाऊसवर रायगड पोलिसांनी धाड टाकून येथे चालणारा बेकायदेशीर जुगार आणि मटका पोलिसांनी उध्दवस्त केला खरा मात्र ज्या मालकाच्या जागेत हा कल्याण जुगार मटका चालत होता त्या फार्म हाऊस मालकाला मोठ्या शिताफीने बाजूला केला आहे. शिवाय ज्या नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ते त्याच फार्म हाऊसवर गार्डन मध्ये काम करणारे मजूर आहेत. फार्म हाऊस मालक अब्बास शेख नामानिराळा राहिला आहे.
ज्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्या एकच रंगाच्या पेहरावावरून हे या फार्म वर काम करणारे मजूर असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट होत आहे. कर्जत पोलिस आणि दादर सागरी पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
दरम्यान या गुन्ह्याचे गोविंद पाटील तपास अधिकारी दादर सागरी पोलिस निरीक्षक हे असल्याने त्यांनी याबाबत प्रस्तुत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘उत्तर देणे बंधनकारक नसून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क केला असता ‘माहिती घेऊन सांगतो.’ असे सांगितले. मात्र फार्म हाऊस मालक अब्बास शेख त्यांच्यावर पोलिस मेहरबान का झाले असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत आणि तशी चर्चा या परिसरातील नागरिकांमध्ये उघडपणे सुरू आहे.
Be First to Comment