कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे हृदयविकाराला आमंत्रण
सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆
एप्रिल महिन्यात उज्जेन इथे एका लग्नामध्ये डीजेच्या तालावर नाचताना १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या हृदयात रक्ताची गुठळी तयार झाल्याचे निदान झाले होते. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नुकताच कोलकात्यामध्ये एका प्रसिद्ध गायकाला संगीताचा कार्यक्रम सुरु असताना अचानक छातीत दुखू लागल्यावर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या १० वर्षात संपूर्ण भारतात मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून आले आहे; व या निमित्ताने कानठळ्या बसविणाऱ्या आवाजावर निर्बंध आणण्याची चर्चा होऊ लागली आहे.
विमानतळावर काम करणारे कर्मचारी, लाईव्ह शो मध्ये काम करणारे तंत्रज्ञान तसेच कलाकार ,औद्योगिक वसाहतीत काम करणारे कर्मचारी , वाहतूक पोलीस यांनी आपल्या ह्रदयाची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मत हृदयविकारतज्ञ डॉ. विनय बोरवाल यांनी व्यक्त केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथिल प्लॅटिनम हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. विनय बोरवाल म्हणाले , ” अमेरिकेत मोठ्या आवाजाने हृदयरोग व पक्षाघात होत असल्याचे एका डॉक्टरांच्या टीमने सिद्ध केले आहे व यासाठी त्यांनी ४९९ नागरिकांचा अभ्यास केला होता व यामध्ये ४० नागरिक हे हृदयविकाराने त्रस्त होते कारण यांची राहण्याची ठिकाणे हि मोठा आवाज होत असलेल्या क्षेत्रातील होती , म्हणूनच पाश्चिमात्य देशात विमानतळे , कारखाने तसेच मोठा आवाज करणाऱ्या फॅक्टरी या राहत्या वस्तीपासून दूर असतात तसेच तिथे वापरण्यात येणारे ९० टक्के फटाके हे फक्त रोषणाई साठी असतात पंरतु भारतामध्ये याउलट स्थिती असून आपल्याकडे ९० टक्के फटाके हे आवाज करणारे असतात. आवाजाचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे वाढणारी हृदयाची धडधड याची निरीक्षणे वैद्यकीय क्षेत्रात नोंदविण्यात आली आहेत.
साधारणपणे ५० ते ६० वर्षे व वयोगटातील लोकांच्या शरीरावर जास्त आवाजाचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ९० डेसिबलपेक्षा अधिक आवाज हा कानासाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे. मोठ्या आवाजामुळे झोपमोड होते, झोप कमी झाल्यामुळे शरीराचा रक्तदाब वाढतो तसेच फुफुसामध्ये हवेचा फुगा होऊन हृद्यविकाराचा झटका येऊ शकतो. ” मोठा आवाज व कोरोना याचे विश्लेषण करताना बोरिवली येथील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे जेष्ठ हृदयविकार तज्ञ डॉ. हेमंत खेमानी सांगतात,” कोरोना व हृदयविकार याचा फारच जवळचा संबंध आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचं आढळून आलंय. भारतात कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे.

कोरोनाचा विषाणू हृदयाच्या स्नायूंमध्ये थेट प्रवेश करतो. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते अशामध्ये ती व्यक्ती सतत मोठ्या आवाजाच्या सानिध्यात राहिली तर त्याचा विपरीत परिणाम हृदयावर होण्याचा धोका असतो कारण कमकुवत झालेले हृदय योग्य पद्धतीने पंपिंग करू शकत नाही.
फुफ्फुस, हात, पाय, मेंदू यांच्यात अचानक गाठ तयार होते व त्या व्यक्तीला हृद्यविकाराचा झटका येतो. कोरोना झालेल्या नागरिकांनी मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणे तूर्तास टाळावे अथवा शक्यच नसेल तर कानामध्ये कापसाचा लहान बोळा घालावा म्हणजे आवाजाचा डेसिबल कमी होईल.”








Be First to Comment