जनजीवन विस्कळित
बाजारपेठेत सन्नाटा
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
सिटी बेल लाइव्ह / पाली-बेणसे (धम्मशिल सावंत)
सुधागडसह संपुर्ण रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 4 ते 6 ऑगस्ट, 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पर्जन्यवृष्टीने जनजिवन विस्कळीत केले आहे.
अशातच मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी पाली, जांभुळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यंदा मान्सुनचे आगमन उशिरा झाले. मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभी व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. निसर्ग चक्री वादळाने संपूर्ण जिल्ह्यात कोट्यवधींची वित्त हाणी व मनुष्यहानी देखील केली होती. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा म्हटलं की रायगडकरांची काळजात धस्स होते.अशातच सलग कोसळणाऱ्या पावसामुळे १९८९ च्या प्रलयकारी महापुराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व गावाला आंबा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने वेढा घातला आहे. अशातच नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. वाकण पाली मार्गावरील अंबा नदी पुल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते. पाली व जांभुळपाडा पुलांचे रुंदी व लांबी वाढविण्याचे काम सुरू असून नवीन पुलाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. दरवर्षी जुन अखेर व जुलै महिण्यात अशाप्रकारे पुलावरुन पाणी गेल्यानंतर वाहतुक ठप्प होते. मंगळवारी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुन्हा एकदा पाली आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तसेच पाली, पेडली व परळी बाजारपेठेत देखील पावसाचा परिणाम होत ग्राहकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.
नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सलग दोन दिवसापासून मुसळधार पाउस सुरु आहे. त्यामुळे सखोल व खोलगट भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. शेतीच्या कामांना देखील खीळ बसला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडत आहेत. तर भुस्खलनाने दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.
पाली बसस्थानक परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र बसेस सुरू नसल्याने प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे होणारा त्रास झाला नाही. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे सुधागडात पावसाचा जोर वाढत आहे. अशातच वनाच्छदीत प्रदेश असलेल्या व अधिक पर्जनवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जाणार्या सुधागडात पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. आभाळ फाटल्याप्रमाणे सतत कोसळणार्या धुवॉधार पावसाने पाली आंबा नदी पुलाने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी










Be First to Comment