सुधागडात वाघोशी येथील भव्य आरोग्य मेळाव्यात 500 हुन अधिक नागरिकांनी घेतला लाभ
सिटी बेल ∆ पाली/बेणसे ∆ धम्मशील सावंत ∆
आरोग्य संपदा हीच खरी संपदा असल्याचे जाणून जनतेच्या निरोगी व सदृढ आरोग्यासाठी आरोग्य शिबीर महत्वाची भूमिका बजावतात. सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाघोशीच्या वतीने व पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाली नगरपंचायत नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्या विद्यमाने वाघोशी येथे नुकतेच मोफत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य मेळाव्यात वाघोशी पंचक्रोशीतील तब्बल 500 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

या आरोग्य मेळाव्यास पाली नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. अजूनही काही ग्रामीण भागातील नागरिक रोगाची, आजाराची लागण होऊनही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रोग व आजार अधिक बळावतो. म्हणून वेळेवर उपचार होऊन वाघोशी पंचक्रोशीतील नागरिक सदैव सुदृढ निरोगी रहावेत या उद्देशाने हे शिबीर भरविले गेले. यावेळी स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन, कान, नाक व घसा तज्ञ, नेत्र रोग चिकित्सक, भिषक, त्वचा रोग तज्ञांनी नागरीकांची आरोग्य तपासणी केली. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, स्वदेस फाऊंडेशन व श्री राज मेडिकल सेंटर परळी यांचे महत्वपूर्ण सहकार्य या शिबिराला मिळाले.

यावेळी सुधागड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष अभिजित चांदोरकर, संजय गांधी निराधार योजना सुधागड तालुका अध्यक्षा साक्षी दिघे, नगरसेवक सुधाकर मोरे, गट विकास अधिकारी विजय यादव, समन्वय समिती सदस्य दिपक पवार, चंद्रकांत घोसाळकर, प्रकाश आवास्कर, सरपंच विशाल चिले, उत्तम देशमुख, सुप्रिया लटके, शशिकांत देशमुख, सुहास कुर्ले, किसन देशमुख, कैलास देशमुख, दिनेश देशमुख, सरपंच कृष्णा पवार आदीसह सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, डॉ नंदकुमार मुळे, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. श्रुती मोरे, डॉ. रसिका पाटील, स्वदेस फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

गावागावांतील अनेक नागरिक छोटे मोठे रोग ,आजार अंगावर काढतात. त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर होतात. यासाठी त्यांच्यावर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. म्हणून अनेक तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नागरिक निरोगी राहावे यासाठी या भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे जांभूळपाडा येथे अशा प्रकारचे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
– गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली
पाली नगरध्यक्षा गीता पालरेचा व स्वदेस फाऊंडेशनमुळे मला विनामूल्य नवीन दृष्टी मिळाली. या मेळाव्यातील तज्ञ डॉक्टरांनी मला योग्य उपचार दिले. त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे.
– विश्वनाथ वाघोस्कर, लाभार्थी, वाघोशी








Be First to Comment