Press "Enter" to skip to content

दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा हुंकार !

२५ हिंदुत्वनिष्ठ व सामाजिक संघटना, संप्रदाय आणि मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग !

सिटी बेल ∆ गोवे-कोलाड ∆ विश्वास निकम ∆

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त दादर, मुंबई येथे २१ मे या दिवशी संपन्न झालेल्या हिंदू एकता दिंडीत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा हुंकार दिला. या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयांतील १ हजार ५०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.

या फेरीमध्ये शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, सनातन संस्थेच्या सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू.(सौ.) संगीता जाधव, वसई (मेधे) येथील श्री परशुराम आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रवीण कानविंदे आदी मान्यवरांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय बजरंग दल, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदू हेल्पलाईन, भारत स्वाभिमान, भगवा गार्ड, स्वतंत्र सवर्ण सेना, अखिल भारतीय ब्राह्मण विकास परिषद, अखिल भारत हिंदु महासभा, हिंदू टास्क फोर्स, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु जनजागृती समिती, हिंद सायकल आणि शिवडी मार्केट गणेशोत्सव मंडळ आदी हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना आणि मंडळे तसेच योग वेदांत सेवा समिती, गायत्री परिवार, वारकरी संप्रदाय, पतंजली योग समिती, श्री राज मरूधर जैन संघ (दादर), वामनराव पै संप्रदाय, माँ शक्ती सामाजिक संस्था आदी संप्रदायांच्या प्रतिनिधींसह हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

दादर (प.) येथील कबूतरखाना जवळील ब्राह्मण सेवा मंडळ चौक येथून आरंभ झालेल्या या हिंदू एकता दिंडीचा आरंभ शंखनाद आणि धर्मध्वजाच्या पूजनाने झाला. या दिंडीतील श्री मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे भाविकांनी भावपूर्ण दर्शन घेतले.

दिंडीच्या मार्गात ठिकठिकाणी सुवासिनी महिलांनी देवीचे औक्षणही केले. पारंपारिक वेश परिधान करून, भगवे झेंडे हातात धरून घोषता देत या दिंडीमध्ये हिंदू बांधव सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या फेरीत सहभागी झालेल्या प्रशिक्षित युवक-युवकांनी लाठीकाठी, दंडसाखळी यांसह दाखविलेली स्वरक्षणाची प्रात्यक्षिके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

या फेरीत हिंदु जनजागृती समितीचे, रणरागिणी पथक, प्रथमोपचार पथकासह डॉक्टरांचे पथक, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांच्या पथकानेही सहभाग घेतला. टाळ, मृदुंगाचा ठेका धरत भजने म्हणत वारकरी पथकही या दिंडीत सहभागी झाले होते तर नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन आणि लेझीम पथकात सहभाग घेतला. योग वेदांत समितीच्या पथकाने स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन या फेरीत केले.

सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शनाचे पथक तसेच हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्या वेशभूषेत असलेल्या सनातनच्या बालसाधकांचे पथक आणि संगीत, नृत्यकला आदी विविध कलांतून साधनेचा दृष्टीकोन देणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी आदी सर्व उत्साहाने फेरीत सहभाग झाले.

‘हिंदू एकता दिंडी’ची सांगता शिवाजी पार्कजवळील चौकात झाली. यावेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर म्हणाल्या, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आवाहनानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येत आहेत. हिंदु एकत्र येतात तेव्हा विश्वकल्याण साधले जाते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमध्ये एकता निर्माण व्हायला हवी.’ योग वेदांत सेवा समितीचे श्री. विनोद मिश्रा, हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दिप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक आदी मान्यवर वक्त्यांनीही हिंदूसंघटनाची आवश्यकता अधोरखित करून एकत्रितपणे राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याचे आवाहन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.