चोरट्यांनी केली कमाल : चक्क पाणी पुरवठा करणार्या सुमारे 11 कि.मी लांबीच्या लोखंडी पाईपची चोरी
कोर्लई ग्रामपंचायतीत लोखंडी पाईपची चोरी करणार्यांच्या विरोधात ग्रामस्त आक्रमक
सिटी बेल • रायगड • धम्मशील सावंत •
सरकारी मालमत्ता असलेल्या मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणार्या सुमारे 11 कि.मी लांबीच्या लोखंडी पाईपची चोरी करून विक्री करण्यात आली आहे. या संबंधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याने संतप्त झालेले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करून चोरीतील गुन्हेगार शोधून कारवाई करण्याची मागणी केली जातेय.
याबाबतचे वृत्त असे की, 2012-2013 मध्ये शासनाने भारत निर्माण योजनेअंतर्गत गावाला पाणी पुरवठा करण्याकरीता फडसाड धरण ते कोर्लई गाव अशी 11 किलोमीटर लांबीचे 4 इंच जीआय (लोखंडी पाईप) टाकण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये कोर्लई ग्रामपंचायती नवीन पाईपलाईन मंजूर झाल्याने फणसाड धरण ते कोर्लई अशी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम ठेकेदारातर्फे काम चालू आहे.

यावेळी जुने पाईप काढून टाकण्यात आले. परंतु सरकारी मालमत्ता असलेले जुने पाईप ग्रामपंचायत कार्यालयात जमा न करता त्याचा अपहार करून चोरी करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्त करीत आहेत.याबाबत ग्रामपंचायतीमध्ये कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. असे नागरिकांनी सांगितले आहे. तसेच चोरी केलेल्या पाईपांची वाहतुक करणारा टेम्पो क्रमांक एमएच 06 बीडब्ल्यू 6020 टेम्पो रंगेहाथ पकडून रेवदंडा पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
याबाबत टेम्पो चालकास विचारले असता हे पाईप रेवदंडा बंदर येथून घेतले असून त्याठिकाणी वैभव महालकर यांनी ट्रकने आणल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.








Be First to Comment