Press "Enter" to skip to content

१६०० लिटर गुळमिश्रित रसायन केले नष्ट

वाघ्रणवाडी जंगलातील हातभट्टी नागोठणे पोलिसांकडून उध्वस्त

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

नागोठणे पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यापासून गावठी दारुविरोधी मोहिम हाती घेतलेले पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने मंगळवारी (दि.२६) सकाळी आणखी एक मोठी कारवाई केली. या कारवाईत नागोठण्याजवळील वाघ्रणवाडी आदिवासी वाडीच्या उत्तरेकडील जंगल परिसरातील एक मोठी हातभट्टी उध्वस्त करुन सुमारे १६०० लिटर गुळमिश्रित रसायनही पोलिसांनी नष्ट केले आहे.

नागोठणे पोलिसांनी धाड टाकलेल्या गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीच्या ठिकाणी २ प्लास्टिक सिंटेक्सच्या टाक्यांपैकी ७०० लिटरची एक टाकी व ५०० लिटरची दुसरी टाकी तसेच २ प्लास्टिकच्या बॅरलमध्ये प्रत्येकी २०० लिटर असे एकूण १६०० लिटर गुळमिश्रित रसायन सापडले. गेल्या काही दिवसांतील मोठी धाड असलेल्या या गुळमिश्रित रसायनाची किंमत ४० रुपये प्रति लिटर दराने ६४ हजार रुपये असल्याची माहिती पो.नि. तानाजी नारनवर यांनी दिली. सापडलेला मुद्देमाल हा वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला आहे.

पो.नि. तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार पो.ह.राजेश जगताप, पो.ना. सचिन भोईर, पो.ना. गंगाराम दुमने, महिला पो.शि. सारिका युवराज मात्रे यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून दारु माफिये मात्र पुरते हैराण झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.