Press "Enter" to skip to content

आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ

कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले काम वाखाणण्याजोगी — आ. रविशेठ पाटील

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

देशामध्ये मागच्या दोन वर्षात आलेल्या कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले मात्र या कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांचे काम वाखणण्याजोगी असल्याचे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचा पेण उपजिल्हा रुग्णालय येथे आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे, तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर, डॉ. वंदनकुमार पाटील, डॉ.अफजलपुरकर, डॉ. वैभव ठाकूर, डॉ.अभिजीत पाटील आदींसह रुग्णालयातील कर्मचारी, आशा वर्कर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना रविशेठ पाटील म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना मोफत लस वाटप केल्यामुळे येणारा कोरोनाचा चौथा टप्पा आपण रोखू शकलो आहोत. आरोग्य विभागासाठी शासनाच्या अनेक योजना येत आहेत. त्या योग्य रीतीने राबविल्यास रुग्णांची संख्या कमी प्रमाणात होणार आहे.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव तांबाळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्याने त्यांचे या ठिकाणी कौतुक करण्यात आले.

तर आरोग्य विभागाच्या दृष्टीने काम करत असताना सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळाला असून कोरोना काळात सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जबाबदारीने काम केले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी सांगितले.या मेळाव्यात उच्च रक्तदाब व मधुमेह १५२, नेत्ररोग १९२, स्त्रियांचे आजार ६९, रक्त व लघवी तपासणी १३९, फिजिशियन ३७०, लहान मुलांचे १७, दंत चिकित्सा १०, नाक कान घसा ३५, अस्थिरोग २५ असे एकूण तालुक्यातील ६९२ रुग्णांनी लाभ घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.