आमडोशी फाटा, वरवठणे ते नागोठणे पोयनाड रस्त्याची दुरावस्था
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रोहा- नागोठणे मार्गावरील आमडोशी फाटा, वरवठणे ते नागोठणे या अंतरातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे तर सोडाच नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसामध्ये न भरल्यास रस्त्यामध्ये जेसीबीने चर खोदण्याचे अणोखे आंदोलन करणार असा इशारा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अलिबाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अलिबाग विभागाकडे असलेल्या व गेले अनेक वर्षापासून रोहा आमडोशी फाटा नागोठणे पोयनाड रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून सदर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असताना अनेकवेळा विनंती,आंदोलनाचे पत्र देऊनही बांधकाम खात्याचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत असा आरोपही किशोर म्हात्रे यांनी केला आहे. सदरचा रस्ता हा अलिबाग विभागाकडे येत असल्याने तेथील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर मी या रस्त्याबाबत अनेक वेळा चर्चा केली असून या रस्त्यासाठी त्यांच्यात आणि माझ्यात अनेक वेळा वादविवाद देखील झाले आहेत. परंतु संबंधित अधिकारी या रस्ताकडे लक्ष का घालत नाहीत ? असा सवालही यावेळी किशोर म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
या बाबत अधिक माहिती देताना म्हात्रे यांनी सांगितले की, सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधीही मंजूर झाला असूनही या रस्त्याचे काम का केले जात नाही. या रस्तावरुन नागरिकांना पायी चालणे तसेच वाहन चालकाला वाहन चालविणे जीकरीचे झाले आहे. त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यामुळे मोटारसायकल चालकाला रस्ता शोधणे मुश्कील होत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे मोटार सायकल चालकाचा अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोड्याच दिवसामध्ये गणरायाचे आगमन होणार असून सार्वजनिक बांधकाम खात्याने येत्या आठ दिवसाच्या आत रस्ते दुरुस्ती न केल्यास मिनिडोअर संघटना, रिक्षा युनियन संघटना, टेम्पो संघटना व स्थानिक जनतेला बरोबर कोरोनाच्या काळातील शासनाच्या नियमावलीचा आदर करून सदर रस्त्याला जेसीबी, पोकलेन च्या साह्याने पाच बाय विस फुटाचा चर खोदण्यात येईल आणि त्यावेळी तेथे घडणा-या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग येथील अधिकारी जबाबदार राहतील याची कृपया प्रशासकीय अधिकारी वर्गाने नोंद घ्यावी अशी विनंतीही किशोर म्हात्रे यांनी केलेली आहे.
दरम्यान या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खाते अलिबाग येथील कार्यालयात संपर्क साधला असता ते म्हणाले की या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेल्या आहेत.






Be First to Comment