प्राथमिक शिक्षक मंच अलिबागच्या वतीने अभ्यासमालेची निर्मिती
पीएनपी कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / राजेश बाष्टे #
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, अनेक पालकांकडे ऍन्ड्रॅाईड मोबाईलच नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येत ऑफलाईन अभ्यासमालेची निर्मिती केली आहे. यामुळे जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे.
या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन पीएनपी शिक्षण संस्थेच्या कार्यवाह तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते रविवारी झूम मिटींगच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी Alibag teachers blog या ब्लॉगचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष नरेंद्र गुरव, उज्ज्वला पाटील, सुबोध पाटील, रवींद्र थळे, अजित हरवडे, सतीश भगत, स्वाती म्हात्रे व तालुक्याध्यक्ष प्रमोद भोपी उपस्थित होते.
शाळा बंद, पण शिक्षण चालू या भूमिकेतून जात असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलिबाग तालुका आदिवासी बहुल आहे. अद्यापही ८० टक्के पालकांकडे ऍन्ड्रॉईड फोन नाही. अशा परिस्थितीत तळागाळातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे घ्यावे? या विवंचनेत असताना अलिबाग तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देण्याचा मान पूर्णत्वात आणला आहे. महाराष्ट्रात ऑनलाईन शिक्षण चालू असताना, अलिबाग तालुक्याने ऑफलाईन शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत एक सुंदर उपक्रम हाती घेतला आहे.
अभ्यासमाला तयार करण्यासाठी शिक्षकांनी स्वच्छेने पुढाकार घेतला व अभ्यासमालेच्या इयत्तानिहाय पीडीएफ तयार करुन त्याच्या झेरॉक्स काढून सदरच्या झेरॉक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. सदरच्या अभ्यासमाला तयार करण्याकरिता सुबोध पाटील, रवींद्र थळे यांच्या नियोजनाखाली व संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष नरेंद्र गुरव, उज्ज्वला पाटील यांच्या प्रेरणेने ही अभ्यासमाला तयार करण्यात आली.
यावेळी प्राथमिक शिक्षकांना येणार्या विविध समस्यांची चित्रलेखा पाटील यांनी झूम मिटींगद्वारे शिक्षकांशी चर्चा केली, तसेच या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, अलिबागची प्राथमिक शिक्षण यंत्रणा उत्तम आहे. अलिबागमधील प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेला हा महत्त्वाकांक्षी उपक्रम कौतुकास्पद आहे. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी व अलिबाग तालुक्याचा गुणवत्ता विकास करण्यास मी कटिबद्ध असेन.
अलिबाग तालुक्यातील शिक्षकांनी निर्मिती केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. भविष्यातील विद्यार्थी सर्व आव्हानांना सामोरा जाणारा असावा त्या दृष्टीने हा उपक्रम उपयोगी पडेल. जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढविणारे विविध उपक्रम शिक्षकांनी करावे, त्या सर्व उपक्रमांना मी स्वतः सहकार्य करेन.
चित्रलेखा पाटील,
पीएनपी कार्यवाह
2तळागाळातील आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा अलिबाग तथा प्राथमिक शिक्षक मंच अलिबागच्या वतीने ही अभ्यासमाला साकारण्यात आली आहे. ८० टक्के पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे या कुटुंबातील हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, या अभ्यामालेच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार आहे.






Be First to Comment