Press "Enter" to skip to content

उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश

भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार प्रकरणी उरणच्या तत्कालीन तहसिलदार यांच्या विरोधात अखेर FIR दाखल

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरणच्या तत्कालीन तहसिलदार श्रीमती कल्पना गोडे यांनी गैरमार्गाचा अवलंब करून भिवंडीवाला ट्रस्टच्या नावे असलेल्या मौजे चाणजे सर्व्हे क्र. ६१/१ , ६७/१ , ६७/२ आणि मौजे म्हातवली सर्व्हे क्र. १६, २७/१५,२७/१६ ता. उरण येथील सोळा कोटी पंचेचाळीस लाख रुपये किमतीची वीस एकर जमीन डोसू अरदेशीर भिवंडीवाला याच्या नावावर करण्याचे अत्यंत गंभीर प्रकरण सन २०१९ मध्ये उघडकीस आणले होते .

सदरहू दोन्ही महसुली गावांतील सहा सातबारा उताऱ्यावर भिवंडीवाला ट्रस्टच्या नावाची स्पष्ट नोंद आहे . तसेच सदरहू डोसू भिवंडीवाला यांनी खोटा वारस दाखला सादर करून त्या आधारे खोटे आणि दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र तत्कालीन तहसिलदार यांना सादर केले होते .

विशेष म्हणजे , या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी यांनी सदरहू जमीन भिवंडीवाला ट्रस्टच्या नावे असल्याने आणि वारस दाखला गैरलागू असल्याने सदरहू जमीन एका व्यक्त्तिच्या नावे होऊ शकत नाही असा स्पष्ट अहवाल सादर केलेला आहे . असे असतानाही तत्कालीन तहसिलदार श्रीमती कल्पना गोडे यांनी डोसू भिवंडीवाला यांच्याशी संगनमत करून आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सर्व सहा सातबारा उताऱ्यावरील ट्रस्टचे नाव कमी करण्यासाठी आणि सदरहू जमीन डोसू भिवंडीवाला यांच्या नावे करण्यासाठीचे आदेश पारित केले आहेत .

त्यानंतर २०१८ मद्धे सदरहू जमीन महेश रतनलाल बालदी यांना १६ कोटी पंचेचाळीस लाख रूपयांना विकल्याचा नोंदणीकृत करारनामा झालेला आहे . सदरहू ट्रस्ट ‘ सर खान बहादूर होरमसजी माणेकजी भिवंडीवाला ‘ सी – ६५८ धर्मादाय आयुक्त , मुंबई येथे नोंदणीकृत आहे . संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या महत्वपूर्ण कागदपत्रांतून हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे .
उरण सामाजिक संस्थेने संबंधित तहसिलदार यांच्यावर कारवाई होण्सासाठी राज्याचे मुख्य सचिव , धर्मादाय आयुक्त मुंबई , जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे मार्च २०१९ मद्ये कागदपत्रांच्या पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे .

दरम्यान या बाबतची माहिती भिवंडीवाला ट्रस्टच्या इतर सदस्यांना मिळाली . त्यांनी स्वतंत्र चौकशी केली असता सदरहू डोसू भिवंडीवाला यांनी वर नमूद खोट्या वारस दाखल्याच्या आधारे भिवंडीवला ट्रस्टच्या नावे असलेली उरण आणि पनवेल तालुक्यातील शेकडो एकर जमीन स्वत:च्या नावे करून इतरांना विकल्याचे व काही सिडको संपादित जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के भूखंड मिळवून शासनाची शेकडो कोटी रूपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाल्याचे समजते .

वरील पार्श्वभूमिवर भिवंडीवाला कुटुंबातील श्रीमती फरीदा दुबाश या महिलेने लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन येथे FIR क्र.
०११५ दि १५.३.२०२२ रोजी दाखल केला असून त्यात डोसू अरदेशीर भिवंडीवाला आणि तत्कालीन तहसिलदार , उरण यांचा नामोल्लेख केलेला आहे .उरण सामाजिक संस्थेनेही हा विषय उचलून धरला होता.

शेवटी उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नाना आता यश आले आहे.उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष कॉ. भूषण पाटील, सरचिटणीस संतोष पवार, महिला आघाडीच्या सीमा घरत, प्राध्यापक राजेंद्र मढवी यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.