मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी उरणकर करणार आत्मक्लेश आंदोलन !
पिरवाडी समुद्रात बसून वेधणार मुंबईतल्या मंत्रालयाचे लक्ष !
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )
क्रान्तीचा महिना म्हणून ओळखल्या जाणार्या ऑगष्टच्या १५ तारखेला स्वातंत्र्यदिनी उरणकरांनी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मागील दहा वर्षांपासून निदर्शने आंदोलने , उपोषणे , उच्च न्यायालयात याचिका या सर्व लोकशाहीवादी आयुधांचा वापर करून ही उरणकरांना हवे असणारे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहिलेच नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उरण तालुक्यातील अनेक रुग्ण केवळ व्हेंटीलेटरची व्यवस्था न झाल्याने मरून जात असल्याचे विदारक चित्र उरण तालुक्यात आहे.
तालुक्यातून अबजावधी वार्षिक उलाढाल सर्व प्रकल्प मिळून होत आहे मात्र स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्षांनंतरही उरण तालुक्याला स्वतःचे हक्काचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मिळू शकलेले नाही. असे रुग्णालय उभारले नाही तर भविष्यात राजकारणातून सन्यास घेण्याच्या बाताही काहींनी मारल्या मात्र ते देखील एक गाजरच ठरले आहे. त्यामुळे सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील रुग्नांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. जे एन पी टी बंदरात काम करणाऱ्या एका कामगाराला कोरोनाची लागण झाल्यावर त्याला वेळेवर व्हेन्टिलेटरची सुविधा होऊ शकली नसल्याने त्या आपले प्राण गमवावे लागले आहेत.
तालुक्यात मागील काही दिवसात कोरोनाने अनेकांचे मृतयू झाले आहेत तर हृदय विकारासारख्या आजारातही वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे एवढ सगळं होऊनही तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन उरण तालुक्यातील प्रकल्पाच्या सी एस आर निधीतून या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बनावे याकरिता फारसे जोर लावताना दिसत नाही याचा निषेध आणि उरण तालुक्याला या ठिकाणच्या सर्व कंपन्यांच्या वतीने एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहावे या मागणीसाठी आता उरणकर आत्मक्लेश करणार आहेत.
आज उरण सामाजिक संस्थेच्या वतीने पाणदिवें गावी संस्थेच्या पदाधिकाऱयांनी सामाजिक अंतर पाळून घेतलेल्या बैठकीतून या आंदोलनाचा एल्गार करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र येत्या सोमवारी तहसीलदार, राज्यशासन, आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. आजच्या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्यासह सचिव संतोष पवार , राजेंद्र मढवी सर , प्रकाश पाटील , रुपेश पाटील, अजित पाटील यांच्यासह लक्ष्मण ठाकूर , मच्छीद्रनाथ घरत , सचिन वर्तक , प्रशांत पाटील, वैभव पाटील, आणि हरीश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गावबंदी करायला गावाच्या वेशीवर बसणारे प्रत्येक गावाचे किमान १५ कार्यकर्ते त्यांच्यासोबत आणखी १५ कार्यकर्त्यांना घेऊन आले तरी हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणी प्रमाणे भाराभर नव्हे नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक प्रकल्प असलेला तालुका म्हणून उरण तालुक्याची गणना केली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारला वर्षाकाठी कोट्यावधी रुपायांचा महसूल मिळवून देणारे अनेक प्रकल्प या ठिकाणी वसले आहेत.
या ठिकाणच्या अनेक प्रकल्पानकडून केंद्र सरकारने मागील काही वर्षात शेकड्यांनी कोटींचा सी एस आर घेऊन गेले आहेत. जे एन पी टी सारख्या बंदरातून कोट्यावधीचा सी एस आर फंडाची उधळण महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात करण्यात आली आहे. मात्र या तालुक्यात एक साधे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय नसल्याने मागील दहा वर्षात शेकड्यांनी युवकांना तातडीने उपचार न मिळाल्याने प्राणास मुकावे लागले आहे. अनेक अत्यवस्थ रुग्णांना पनवेल , वाशी, नवी मुंबई ,मुंबई आदी ठिकाणच्या रुग्णालयात हलवितांना त्यांचे प्राण रस्त्यातच गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या येथील विविध बंदरे आणि प्रकल्पाच्या माध्यमातूनच तालुक्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.
या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कंपन्यांच्या माध्यमातून काढल्या गेलेल्या आरोग्य विम्याचा लाभ मिळत असला तरीही सामान्य उरणकरांना मात्र याच कंपन्या आणि बंदरांच्या माध्यमातून तालुक्यात पसरल्या गेलेल्या कोरोनामुळे जगणं असह्य झाल्याची स्थिती तालुकाभरात पाहायला मिळत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर उरण तालुक्यात एखादे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील आणि कामगार नेते भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखालील उरण सामाजिक संस्था सातत्याने लढत आहे. त्यातूनच मोर्चे , निदर्शने , उपोषणे , लाक्षणिक उपोषणे , धरणे आंदोलन , आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका झाली आहे. त्यातील अनेक सुनावण्यांमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमुर्तीनी जेएनपीटी ने ट्रॉमा केअर सेंटर उभारावे असे निर्देशित केले आहे.
त्यानंतर सध्या जे एन पी टी टाऊनशिप मध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभे राहिले आहे मात्र त्यातल्या सुविधा देखील स्थानिकांसाठी कमी पडत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात आहे.प्रत्येकवेळी प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि आश्वासनेच हाती मिळाल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाने एकोप्याने ठरविल्यास तालुक्यातल्या सर्व प्रकल्पाच्या सी एस आर फंडातून तालुक्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणे फारसे अवघड नाही. जासई दास्तान फाटा येथे शिवस्मारक उभारणीत जी तत्परता दाखवली गेली ती या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे याबाबत दाखवली जात नाही.
प्रशासकीय अधिकारी वर्गाचे पगार वेळच्या वेळी मिळणारी प्रशासनात बसलेली माणसे याकडे आजतागायत सजगतेने बघूच शकलेले नाहीत आणि सर्वात हास्ययास्पद बाब म्हणजे लोकप्रतिनिधींना याबाबत काही पडलेले दिसत नसल्याची स्थिती सध्या उरण तालुक्याची झाली आहे. त्यातूनच कोरोना सारख्या महामारीत उरण तालुक्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या अनुशंगाने आता राज्य सरकारनेच यात हस्तक्षेप करून उरण तालुक्यासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहण्यासाठी लक्ष घालावे म्हणून १५ ऑगष्टला संघटनेचे कार्यकर्ते उरणच्या पिरवाडी समुद्र किनारी समुद्रात बसून मंत्रालयात बसणाऱ्या राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचे आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा निर्धार काल शनिवारी पार पडलेल्या बैठकीतून करण्यात आला आहे .
या निमित्ताने तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उरण तालुक्यातील सर्व प्रकल्प किमान १५ दिवसांसाठी बंद करण्याची मागणीही करण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सोमवारी उरण तहसीलदार , उरण पोलीस , जिल्हाधिकारी रायगड आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांना धाडण्याचे ही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.






Be First to Comment