Press "Enter" to skip to content

कोप्रोली उरण येथे कार्यालय

काँग्रेसच्या विभागीय कार्यालयाचे चारूलता टोकस यांच्या हस्ते उद्घाटन

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

रायगड जिल्ह्यात सर्वत्र काँग्रेस पक्षातर्फे डिजिटल सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या डिजिटल सदस्य नोंदणीला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला काँग्रेसचे सदस्य बनवायचे आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत अर्थात रायगड जिल्ह्यात जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करा. डिजिटल सदस्य नोंदणीत रायगड जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आला पाहिजे असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी चारूलता टोकस यांनी कोप्रोली उरण येथे केले.

रायगड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार जोरात सुरु असून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उरण तालुक्यातील कोप्रोली येथे काँग्रेस पक्षाचे विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले. त्या कार्यालयाचे उदघाटन चारूलता टोकस यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डिजिटल सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करावे. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मेहनत घ्यावी. प्रामाणिक एकनिष्ठ व मेहनती कार्यकर्त्यांमुळेच काँग्रेस पक्ष जिवंत आहे. जेंव्हा काँग्रेस पक्षाला नेत्यांची, पुढाऱ्यांची गरज होती तेंव्हा त्यांनी पक्ष बदलला. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहिला. आजही तो एकनिष्ठ आहे. त्यामुळे आजही पक्षाचे कार्य चांगल्या पद्धतीने चालू आहे. असे सांगत चारूलता टोकस यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या कार्याचे कौतुक करत अजून जोमाने कामाला लागण्याचे आदेश देत शुभेच्छा दिल्या.

महेंद्र घरत यांनीही आपल्या भाषणात कार्यकर्ते पदाधिकारी यांना जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. विभागीय कार्यालय सुरु झाल्याने सर्वसामान्य व्यक्तीला हक्काचे ठिकाण मिळाले. या कार्यालयातून जनसंपर्क वाढवायला मदत होईल असे मत व्यक्त केले.

यावेळी सर्वाधिक डिजिटल सदस्य नोंदणी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, अल्पसंख्याक विभागाचे अखलाक शिलोत्री, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, सरचिटणीस महेंद्र ठाकूर, सरचिटणीस जीवन गावंड, तालुकाध्यक्ष रेखा घरत, उपाध्यक्ष निर्मला पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, विवेकानंद म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.