जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन
सिटी बेल • सुकापूर •
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या आणि जाणीव सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिराचे आयोजना बाबत अधिक माहिती देताना राजेश केणी म्हणाले की तेरणा मेडिकल ट्रस्ट, मोरया डेंटल क्लिनिक, आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज अशा नानाविध संस्था या महाआरोग्य शिबिरात सहभागी होत आहेत.

सदर शिबिरात मधुमेह तपासणी, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा,थायरॉईड तपासणी,अस्थी घनता, हृदयरोग तपासणी याशिवाय जनरल ओपीडी असणार आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर विनामूल्य नेत्र शस्त्रक्रिया तसेच हृदय रोगावरील उपचार विनामूल्य करण्यात येतील.
जाणीव सामाजिक संस्था ही अत्यंत सजग पद्धतीने समाजातील तळागाळातील घटकांना न्याय देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी हिरीरीने झटत असते. गरीब गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारी संस्था असा नावलौकिक त्यांनी अल्पावधीत मिळविला आहे. याच संस्थेच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजेश केणी यांच्या वतीने करण्यात येत आहे.








Be First to Comment