Press "Enter" to skip to content

आरोग्य क्षेत्रात डिजिटल प्रभाव वाढतोय

नागरिकांचे वर्क फ्रॉम होम तर डॉक्टरांचे वर्क फ्रॉम हॉस्पिटल  !!

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आरोग्य व आरोग्यव्यवस्था हा प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीविरोधात लढताना अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिकांना डॉक्टरांची भेट मिळत नव्हती तसेच अनेक लॅब्स व  हॉस्पिटलमध्ये शारीरिक वैद्यकीय  तपासण्या करण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले होते. अशावेळी सर्वांच्या मदतीला आले ते माहिती तंत्रज्ञान ! डॉक्टर एका जागी बसून शेकडो रुग्णांशी संवाद साधू लागले. अनेक नागरिकांनी वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी बाजारात  उपल्बध असलेले साहित्य अथवा किट विकत घेतली यामुळे मधुमेह तसेच उच्च रक्तदाब  व इतर किरकोळ आजार असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून हाच डिजिटल ट्रेंड आता आरोग्यक्षेत्रात स्थिरावू पाहत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटलचे संचालक तसेच हृदयशल्यविशारद व वस्क्युलरतज्ञ डॉ. बिजॉय कुट्टी सांगतात, ” कोरोना महामारी हि सर्व जगामध्ये आली होती त्यामुळे संपूर्ण जग डिजिटल माध्यमातून संवाद साधत होते व याला आरोग्यक्षेत्राचा सुद्धा समावेश होता. आपल्याला हाच डिजिटल ट्रेंड आरोग्यक्षेत्रात ठेवायचा असेल तर याला मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे.

भारतामध्ये आजही अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत त्यामुळे डिजिटल आरोग्यक्षेत्र हे कदाचित काही शहरापुरते मर्यादित राहू शकते. डिजिटल आरोग्य संकल्पना ही वयोवृद्ध तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांसाठी नक्कीच वरदान आहे परंतु एका ठराविक परिस्थितीनंतर त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्येच भरती करावे लागते. आज अनेक नागरिक “वर्क फ्रॉम होम” करीत असले तरी डॉक्टरांचे  ” वर्क फ्रॉम हॉस्पिटल” सुरु झाले आहे.

कोरोना महामारीनंतर अनेक नागरिक डॉक्टरांशी मोबाईल अथवा इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या उपचार घेण्यास उत्सुक असले तरी भविष्यात हीच स्थिती राहील याची कल्पना नाही, कारण प्रत्यक्ष भेटीमध्ये डॉक्टर व रुग्णाचा संवाद जेवढा यशस्वी होतो तेवढा संवाद इंटरनेट माध्यमातून यशस्वी होत नाही.”

आरोग्यक्षेत्रावर डिजिटल तंत्रांच्या प्रभावाचे विश्लेषण करताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे हृदयरोगतज्ञ  व ह्रदयशल्यविशारद डॉ. महेश घोगरे म्हणाले, ” डिजिटल तंत्रज्ञानाची एक जमेची बाजू म्हणजे ती तुमच्यासोबत कायमची असते , तुम्ही आपल्या मोबाईल तसेच  ऍपच्या माध्यमातून आपल्या तसेच आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर पाहु शकता परंतु तुम्ही आरोग्याच्या बाबतीत सर्वस्वी डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही त्यासाठी डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात.

हृदयविकार हा आजमितीला सर्वात गंभीर आजार मानला जातो अशा आजारामध्ये डॉक्टरांचे मत अथवा तपासणी वेळच्या वेळी घेणे गरजेचे असते. अनेक नागरिक आजही कोरोना महामारीच्या भीतीतून बाहेर आलेले नाहीत त्यामुळे ज्या नागरिकांना कोरोना झाला होता अशा नागरिकांनी पुढील दोन वर्षे आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. आरोग्याच्या माहिती संकलनासाठी डिजिटल तंत्रज्ञान प्रभावी ठरत असले तरी गंभीर उपचारासाठी फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे योग्य नाही.”

प्राचीन काळापासून आरोग्याला आपल्या समाजात प्राधान्य देण्यात आलेले आहे. सर्वांगीण आरोग्य’ ही संकल्पना आयुर्वेदात प्राचीन काळापासून मांडण्यात आलेली आहे. सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत रुग्णालय, सॅनिटोरियम, स्त्रिया-मुलांसाठी वेगळी रुग्णालये असल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. आरोग्यक्षेत्रात रुजू झालेला डिजिटल प्रभाव हा नक्कीच दिलासादायक आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातून मेडिसिनची होम डिलिव्हरी, घरबसल्या वैद्यकीय तपासण्या, होम डायलेसिस तसेच घरीच केमोथेरपी उपचार करणे आरोग्यक्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.