रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार, पालकमंत्री व आमदारांना निवेदन
सिटी बेल लाइव्ह / धाटाव(शशिकांत मोरे)
रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा याकरिता आता रोहा तालुका सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.नुकत्याच झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्ये प्रकरणी सापडलेल्या सर्वच नराधमांवरील खटला फास्ट ट्रक वर घेऊन आणि विशेष सरकारी वकील नेमुन नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली अाहे.याबाबतचे निवेदन समाजाच्या वतीने रायगडचे खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे व विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांना नुकतेच सुतारवाडी येथील निवासस्थानी देण्यात आले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत रोहा तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख,महेश सरदार,संदीप सरफळे,निलेश शिर्के,संदीप सावंत,सुहास येरूनकर, यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता या घटनेची पालकमंत्री या नात्याने गंभीर दखल घेऊन आदिती तटकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात व्यक्तिश: भेट घेतली आणि त्यांना या घटनेतील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने गृह विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी पत्रान्वये विनंती केली असल्याचे खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले.तर मी स्वतः विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी बोलून हा खटला त्यांनी चालवाला अशी विनंती केली असता त्यांनी सुद्धा याकरिता होकार दिला असल्याचे सांगितले.आरोपी बाबत सबल पुरावे व अधिक तपास करून दोषारोपपत्र दाखल होण्याकरिता कुठलीही तांत्रिक अडचण येणार नाही अशी खबरदारी घेण्याचे पोलीस यंत्रणेलाही तशा सूचना केल्या असल्याचेही शेवटी तटकरे म्हणाले.






Be First to Comment