सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
आपण सर्व ज्या गणेशोत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तो लवकरच सुरू होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया आता काही प्रमाणात सुरू झालेली असताना अतिशय खबरदारी बाळगत यंदा आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे. आपल्या कोकणात खरंतर जगभरातून चाकरमानी गणेशोत्सवात आपापल्या गावी येत असतात. यंदा हे प्रमाण कमी असले तरी बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना दूर ठेवणे किंवा १४ दिवस आधी इथे क्वारंटाईन करून ठेवणे, हे सोयीस्कर ठरणार नाही. म्हणून गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कोकण विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी केले आहे.
आ. अनिकेत तटकरे आवाहन करतांना म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदा गणपती दर्शनासाठी किंवा आरतीसाठी एकमेकांच्या घरी जाणं, गर्दी करणं यावर्षी पूर्णपणे टाळायचं आहे. सामान खरेदीसाठी आणि विसर्जनासाठी नेमक्याच तरूण मुलांवर जबाबदारी दिली म्हणजे बाजारात गर्दी होणे व परिणामी प्रादुर्भाव टळेल. हे व असे अनेक उपाय साधत आपल्याला लोकमान्य टिळकांनी जसा इंग्रजांविरोधात समाज एकवटण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला, त्याचप्रमाणे करोनाविरोधात आपापल्या घरी उत्सव साजरा करून आपल्याला लढा द्यायचा आहे. या करोनाच्या महारोगावर लवकरात लवकर काही उपाय निघून आपली या संकटातून सुटका होवो, हीच गणराया चरणी प्रार्थना असेही आमदार तटकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.






Be First to Comment