Press "Enter" to skip to content

डोळ्यांचा रंगांपासून करा बचाव

होळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगाचा अतिवापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

कोरोना महामारीचा धोका तूर्तास टळला असल्यामुळे यावर्षी रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे. मुंबई व लगतच्या शहरांमधील बाजारपेठा पाण्याच्या पिचकाऱ्या व विविध रंगांनी सजल्या आहेत. होळी खेळताना उत्साहाच्या भरात अनेकवेळा आपल्याकडून अनेक चुका सुद्धा होत असतात त्यामुळे डोळ्यांना सुद्धा इजा होऊ शकते. होळीमध्ये खासकरून डोळ्यांचा रंगांपासून बचाव करणे फारच आवश्यक असते. कारण डोळे हे आपल्या शरीरातील नाजूक अवयवांपैकी एक आहेत. म्हणूनच होळी खेळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

याविषयी अधिक माहिती देताना घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे नेत्र विकार तज्ञ डॉ. मेहुल संघवी सांगतात, ” होळीचा रंग: कारखान्यात वापरात येणारी पावडर  मका तसेच तांदळाच्या पिठापासून बनवला जातो ज्यामुळे धुळीसारखा पोत तयार होतो. याशिवाय, या रंगामध्ये   सोडियम बायकार्बोनेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट किंवा सिलिकॉन डायऑक्साइड, कॅल्शियम कार्बोनेट आणि विविध सुगंध असतात. या रसायनांच्या संपर्कात आल्याने डोळ्यांची ऍलर्जी, संसर्ग, तात्पुरते अंधत्व आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात  दाह होऊ शकतो.

आपले डोळे हे अत्यंत संवेदनशील असतात त्यामुळे होळीच्या दिवशी रंग खेळण्यापूर्वी डोळ्याभोवती खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली किंवा कोणतीही चांगली कोल्ड क्रीम लावायला विसरू नका. त्यामुळे डोळ्यांवरील रंग सहज निघण्यास मदत होईल तसेच डोळ्यांवर पडणारा रंगही पापण्यांना चिकटतो आणि डोळ्यांचे संरक्षण होते. होळी  खेळताना  सनग्लासेस किंवा चष्मा वापरणे गरजेचे आहे  यामुळे तुमच्या डोळ्यांचे काही प्रमाणात संरक्षण होईल. होळी खेळताना तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातल्या नाहीत याची  खात्री करा आणि जर तुम्ही त्याशिवाय खेळू शकत नसाल, तर तुमच्या डोळ्यात रंग जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. पाण्याचे फुगे हे सर्वात धोकादायक आहेत त्यामुळे  डोळ्यांना बोथट आघात होऊ शकतात तसेच  डोळ्यात रक्तस्त्राव होऊ शकतो, अतिवेगवान पाण्याच्या फुग्यामुळे डोळ्याला दुखापत झाल्यास, डोळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका कारण पाणी दूषित असू शकते आणि संसर्ग होऊ शकतो. तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्या परिसरातील जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नेत्रविकारतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. रासायनिक रंग वापरण्यापेक्षा बेसन, पलाश ची पाने, पाण्यात भिजवलेले बीटरूट, मेंदीची पावडर, गुलमोहर, जास्वंदीची  फुले आणि इतर नैसर्गिक पदार्थ  वापर करून रंग बनविता येतात. बाजारात उपलब्ध असललेला हर्बल गुलाल होळी खेळण्यासाठी वापरावा.”

होळीच्या रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंगांची उधळण करणारा हा सण साजरा करताना सावधानता बाळगणे महत्त्वाचं आहे  वास्तविक पाहता रंगांच्या डब्यावर ‘केवळ औद्योगिक उपयोगासाठी’ असा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा, मात्र आपली त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे असे मत झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे नेत्रविकार तज्ञ डॉ. मेहुल संघवी यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.