खासदार सुनिल तटकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
मी राजकारणात १९८४ साली प्रवेश केल्यापासून मला सतत मार्गदर्शन व आशीर्वाद देणारे अण्णासाहेब पालकर यांचे काल दुर्देवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक पितृतुल्य नेतृत्व हरपले आहे अशा शब्दांत रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सन १९८५ पासून त्यांनी मला सतत प्रेरणा दिली आहे. वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. प्रसंगी स्पष्टवक्ते असल्याने स्पष्टपणाने काही बाबी मला सांगितल्या. असे परखड नेतृत्व हरपल्याचे अतीव दु:ख होत आहे अशा शब्दांत खासदार तटकरे यांनी अण्णा पालकर यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. रातवड (ता.माणगाव) येथील पंढरीनाथ उर्फ अण्णा पालकर यांचे शनिवार दि. १ आॅगस्ट रोजी रात्री ११.१५ वा. मुरुड येथे निधन झाल्याचे समजताच खा. सुनील तटकरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
माणगाव तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष, माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच जिल्ह्यातील नेतृत्व त्यांनी केले. अध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी माणगाव तालुका व रायगड जिल्ह्यात दीर्घकाळ समाजसेवा केली. सर्वांशी उत्तम पद्धतीने संवाद करत आपले एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले. गेल्या ४०-४५ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असताना, निवडणुकांना सामोरे जात असताना माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे, असे खा. तटकरे यांनी सांगितले.
गेली काही वर्ष त्यांची तब्येत ठीक नसतानाही अनेकवेळा खा. सुनिल तटकरे त्यांची भेट घेत असत. मुरूडला त्यांचे जावई मंगेश दांडेकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सल्ला, मार्गदर्शन व आशीर्वाद घेत असत. काल त्यांच्या जाण्याने एक मोठी सामाजिक पोकळी निर्माण झालेली आहे, असे म्हणत खा. तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व तटकरे कुटुंबियांच्या वतीने अण्णासाहेब पालकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.






Be First to Comment