आता ठरलं ! ग्रामीण रुग्णालयासाठी स्वातंत्र्य दिनी पालीत होणार धरणे आंदोलन..!
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील प्रलंबीत ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. महेश पोंगडे महाराज 15 ऑगस्टला जनआंदोलन करणार आहेत. या संदर्भातील निवेदन त्यांनी सुधागड-पाली तहसीलदारांना नुकतेच दिले.
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील कष्टकरी, श्रमजीवी, मजूर व आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वसोईसुविधा पूर्ण अद्ययावत रुग्णालय असणे गरजेचे आहे. गोरगरीब सर्वसामान्य जनतेला खाजगी महागडे उपचार परवडणारे नाहीत. तालुक्यातील एखादा गंभीर रुग्ण अथवा गर्भवती महिलेवर जलद व योग्य उपचार मिळावे अशी परिस्थिती येथे नाही. शिवाय तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अथवा मुंबईला हलवले जाते. अशा वेळी अनेक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना दुर्दैवी प्राण गमवावे लागले असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पालीत ग्रामीण रुग्णालय निर्माण होण्याच्या दृष्टीने अनेकदा विविध पक्षाने नारळ फुटलेत, मात्र पुन्हा त्या भूमीपूजनाच्या पाट्यांकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. त्यामुळे समाजसेवक पोंगडे महाराज यांनी संविधानिक मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
पाली तहसील कार्यालयासमोर स्वातंत्रदिनी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी सामील होण्याचे आवाहन पोंगडे महाराज यांनी केले आहे.






Be First to Comment