कशेडी घाटातील वाहतुकीच्या खोळंब्यानंतर सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वाहतुकीच्या खोळंब्यानंतर रविवारी सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर प्रवाशांचे नाव व पत्ता नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कशेडी घाटातील कशेडी बंगला येथे रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा बंदी पुकारण्यात आली होती. यामुळे जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांची वैद्यकीय प्रमाणपत्रे व इ पास यांची तपासणी केली जात होती. शनिवारी अनलॉक-3 मिशन बिगीन्स अगेन सुरु झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाहने मोठया संख्येने कशेडी घाटातून जाऊ लागली. त्यामुळे कशेडी बंगला येथील तपासणी नाक्यावर वाहने थांबवून प्रवाशांची कागदपत्रे तपासण्याची मोहीम सुरू झाली. शनिवारी दिवसा व रात्री मोठया प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या चार कि.मी.पर्यंत रांगा लागल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी डायवर्शन रोडवर वाहने समोरासमोर आल्याने वाहतुकीचा वेग मंदावून महामार्गावर वाहनांची दाटी झालेली दिसून आली. कशेडी घाटाकडे ही वाहने गेल्यानंतर तेथे सुरू असलेल्या वाहन इ पास व प्रवाशांचे आरोग्य प्रमाणपत्र तपासणीमुळे शेकडो वाहने रखडल्याने कशेडी बंगला येथील तपासणी नाक्यापासून भोगाव येलंगेवाडी दत्तवाडीपर्यंत तब्बल चार किलोमीटर अंतराची रांग उभी राहिली. परिणामी, मोठया प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रखडावे लागले. यामुळे चाकरमान्यांच्या नाराजीचा सूर प्रचंड प्रमाणात उमटून सिटी बेल लाइव्हसह काही वृत्तवाहिन्यांवर वाहतुकीच्या खोळंब्याच्या बातम्या झळकल्या. यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला जिल्हाबंदी आणि प्रवेशासाठी ची कागदपत्रे तपासणीची मोहीम गुंडाळून घ्यावी लागली. केवळ वाहनांची नोंदणी व चाकरमानी प्रवाशांची नावे आणि पत्ता एवढीच नोंद होऊन वाहनांना मार्गस्थ करण्यात येऊ लागले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा दूर झाला.
कशेडी टेप पोलीस चौकी येथील तब्बल 15 पोलीस कर्मचाऱ्यांना सर्दी पडसे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागला असताना दोन पोलिस कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
दापोली मंडणगड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी कशेडी घाटातील पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि मास्क यांचे मोफत वाटप करून आस्थापूर्वक चौकशी केली.
कशेडी बंगला गावातील हॉटेल वजा टपऱ्यांवर वाहने आणि प्रवासी यांचे इ पास व कागदपत्र तपासणी दरम्यान मोठया प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी होऊन चहा, नाश्ता व अन्नपदार्थ विक्री होत असल्याने हे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कमालीचा गलथानपणा जाणवत आहे. अशातच, तपासणी नाक्याजवळ अचानक ऊन, पाऊस, ढग आणि धुक्याचा प्रभाव दिसून येत असल्याने वातावरण सतत बदलून पोलीस व महसूल कर्मचारी यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. याखेरीज वाहतुकीचा खोळंबा झाल्यानंतर थांबलेल्या वाहनांच्या धुरामुळे देखील या परिसरामध्ये दमा व खोकला वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे, कशेडी बंगला येथील हा तपासणी नाका रत्नागिरी जिल्हा हद्दीतील घाटउतारावर लोकवस्तीपासून दूर नेल्यास आरोग्यविषयक तक्रारी दूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






Be First to Comment