महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये नोकरी करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) देणे बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
आता महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये नोकरी करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) देणे बंधनकारक असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी ‘महाजॉब्स पोर्टल’ सुरू करताना ही घोषणा केली.
राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. तसेच राज्यातील उद्योजकांनादेखील कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून महाजॉब्ज संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलचे लोकार्पण झाल्यानतंर त्याला केवळ चार तासात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.उद्घाटनानंतर केवळ 4 तासातच सुमारे 13 हजार 300 पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर 147 उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नातून उद्योग क्षेत्राचे हित लक्षात घेऊन हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तथापि, यात समाविष्ट असणाऱ्या डोमिसाइलच्या अटीमुळे नवीन राजकीय वाद निर्माण होऊ शकतो. कारण महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र फक्त त्यांना दिले जाते जे किमान 10 वर्षे येथे वास्तव्याचा पुरावा देऊ शकतात. विशेष म्हणजे बहुतेक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तात्पुरत्या कामगारांकडे तर येथील रेशनकार्ड देखील नसते. अशा परिस्थितीत त्यांना डोमिसाइल सादर करणे शक्य होणार नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परप्रांतीयांसाठी स्थलांतरित धोरण तयार करावे आणि त्यांच्या राज्यातील कामगारांची गरज भासल्यास यूपी सरकारशी संपर्क साधावा असे म्हटले होते. आता महाजॉब्स पोर्टलवर अधिवास हा मुद्दा जोडून महाराष्ट्र सरकार ने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही म्हटले आहे की, आता इतर राज्यातून आलेल्या कामगारांना महाराष्ट्रात नोंदणी करावी लागेल.
Be First to Comment