आमदार महेंद्र दळवी यांचे उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन
सिटी बेल • उरण • वैशाली कडू •
कोकणचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे अपुरे राहिलेले करंजा रेवस पुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने पाठपुरावा ठेवत त्याची निविदा ही प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे करंजा-रेवस पुलाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या यशस्वी पाठपुराव्या बद्दल आमदार महेंद्र दळवी यांची उरण तालुका मराठी पत्रकार संघाने भेट घेत त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
१९८२ पासून अलिबाग तालुक्यातील रेवस ते करंजादरम्यान पूल बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री स्व.ए.आर. अंतुले यांनीदेखील हा पूल बांधला जावा, यासाठी प्रयत्न केले होते. हा पूल तयार झाल्यास तळकोकणात जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग तयार होऊ शकेल, तसेच अलिबाग शहरातील नागरिकांना घ्यावा लागणारा ७० किलोमीटरचा वळसा वाचणार आहे.

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे निवडून आल्यापासून त्यांनी सातत्याने या पुलासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. यापूर्वी या पुलाच्या मागणीला पाच दशके लोटली आहेत. पण प्रत्येक वेळी कोरडय़ा आश्वासनांपलीकडे काहीच हाती लागले नाही. महाविकास आघाडी सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले असून रेवस-करंजा पुलाचे स्वप्न साकारणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. या पुलामुळे विकासाची गंगा येणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले साहेबांचे स्वप्न साकार होणार आहे. यामुळे गेली ४० वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आज जो काही मी आमदार आहे तो बॅ. अंतुले साहेबांची कृपा आहे. त्यामुळे त्यांचे करंजा-रेवस पुलाचे अधुरे राहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून याकामी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मदत करीत आहेत. त्यामुळे करंजा-रेवस पुलाचे स्वप्न येत्या ३ ते ४ वर्षात पूर्ण करणार असे सांगत या विभागात एमआयडीसीचा सर्वात मोठा प्रकल्प आणून या भागाच्या विकासाबरोबर बेरोजगारीचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले. यावेळी उरणमधील प्रलंबित असलेला हॉस्पिटलचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन पत्रकार संघाला दिले.
या यशाबद्दल उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, दिलीप कडू, चिटणीस अजित पाटील, सदस्य आशिष पाटील, पूजा चव्हाण यांनी आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.








Be First to Comment