पाणदिवे गावात हेमंत ठाकूर यांच्या घरात घुसला कोब्रा जातीचा साडेसाहा फुटी साप
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
उरण तालुक्यातील पुर्व विभागात पाणदिवे गावात ठाणे जीवनदीप वार्ताचे उरण प्रतिनीधी हेमंत ठाकूर यांच्या राहत्या घरी कोब्रा जातीच्या साडेसाहा फुटीच्या सापाला FRENDS OF NATURE (FON) या संस्थेचे सर्पमीत्र गोरखनाथ म्हात्रे यांनी पकडून जीवनदान दिले.
घराबाहेर खेळत असलेल्या मुलीला पाण्याच्या टाकीच्या कोपर्यात साप जाताना दिसला लगेच सृष्टीने घरात असलेल्या माणसांना याची माहिती दिली. नंतर क्षणाचाही विचार नकरता हेमंत ठाकूर यांनी पाले गावातील सर्पमीत्र गोरखनाथ म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. गोरखनाथ म्हात्रेंनीही कार्यतत्परता दाखवत सात ते आठ मिनीटांतच तेथे हजेरी लावली आणि कोब्रा जातीच्या सापाला पकडून जीवनदान दिले.

विशेष म्हणजे यशस्वीरित्या नागाला पकडून झाल्यावर उपस्थितांना गोरखनाथ म्हात्रे यांनी विवीध जातींच्या सापांची माहीती दिली. उपस्थितांमध्ये पाणदिवे गावातीलच नागरीक नव्हते तर कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, आवरे इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते . त्यामुळे कुठलेच नियोजन नसताना निसर्ग संवर्धनासाठी आणि संगोपनासाठी, सापांबद्दल नागरीकांच्या मनात असलेली भीती घालविण्यासाठीचा एक कार्यक्रम सर्पमीत्र गोरखनाथ म्हात्रे यांनी पार पाडला. ते देत असलेल्या माहितीतून त्यांचे निसर्गप्रेम आणि निसर्ग संवर्धनाची कळकळ दिसत होती.
गेल्या पंधरा वर्षात ८५०० पेक्षा जास्त सापांना जीवदान देण्याचे काम गोरखनाथ म्हात्रे यांनी पार पाडले आहे. “या गोष्टीचा मला अभिमान अजिबात नाही पण आनंद आहे” असे त्यांनी अगदी नम्रपणे सांगितले. आताच्या डिजीटल युगात साप पकडल्याची आणि सोडल्याची व्हिडिओ संस्थेला द्यावी लागते असेही त्यांनी सांगितले. १३ फुट अजगर एकट्याने पकडल्याची थरारक घटनाही उपस्थितांना सांगितली.
सर्पमित्र गोरखनाथ म्हात्रें सोबत हेमंत ठाकूर यांचे भाऊ मकरंद ठाकूर यांनीही सापांबद्दल त्यांना आलेले अनुभव सांगितले.








Be First to Comment