Press "Enter" to skip to content

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.प्रियंका शुक्ला यांची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतील महिलेच्या गर्भाशयातुन काढली अडीच किलोची गाठ

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

मुंबईतील एका ५५ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातील सुमारे २.५ किलो वजनाची गाठ बोरिवली येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका शुक्ला यांना काढण्यात यश आले आहे.

बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर सुवर्णा यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सिटी स्कॅन केल्यावर त्यांच्या गर्भाशयात एक मोठी गाठ (ट्युमर) आढळून आली व या गाठीमुळे त्यांच्या मूत्राशयावर दाब येत होता व लघवी करण्यास अडथळा येत होता.

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रियंका शुक्ला म्हणाल्या, ” सुवर्णा यांच्या गर्भाशयात एक मोठी गाठ ( ट्यूमर) होती, एखाद्या गर्भवती महिलेप्रमाणे त्यांचे पोट दिसत होते. लघवीला अडथळा आल्यामुळे शरीरात इतर तक्रारी सुरु झाल्या होत्या. त्यामुळे आमच्या टीमने हे गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सुवर्णा यांचे वय पाहता आम्ही ओपन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

गर्भाशयातील या ट्युमरची लांबी व रुंदी २५X २० सेमी असून त्याचे वजन २.५ किलो होते. ३० ते ५५ वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे त्यांच्या गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाणही अधिक असतं, शिवाय, ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते.वेगवेगळ्या परिस्थितीनुसार या गाठींचा आकार मटाराच्या दाण्यापासून ते अगदी कलिंगडाएवढासुद्धा असू शकतो. अर्थात गाठ जेवढी मोठी तिचा त्रास तेवढाच जास्त. असतो, या केसमध्ये सुद्धा कलिंगडाच्या आकाराचा ट्युमर काढण्यात आमच्या टीमला यश आहे. सुवर्णाला आम्ही तीन दिवसामध्ये घरी सोडले असून त्यांची तब्येत चांगली आहे.”

फायब्रॉइड ही गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली एक प्रकारची गाठ आहे. शरीरातील स्त्री हार्मोन्समधील बदलामुळे अशा प्रकारच्या गाठी होतात. गर्भाशयाचे मधले अस्तर बनलेले असते स्नायूपेशी आणि तंतुपेशी यांच्या मिश्रणाने. या अस्तरातल्या स्नायूपेशींची काही कारणांमुळे जास्त वाढ झाल्यास त्यांचे रूपांतर लहानमोठ्या गाठींत होते आणि यांनाच म्हणतात फायब्रॉइड बऱ्याच वेळा यामागे आनुवंशिक कारण असू शकते.

वंध्यत्वाने ग्रासलेल्या स्त्रिया, एखादेच मूल असलेल्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड जास्त प्रमाणात आढळून येतात. गाठी अनेक असतील, मोठ्या असतील किंवा त्यांच्यामुळे पाळीच्या तक्रारी उद्भवत असतील तर कधी कधी ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो, अशी माहिती अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका शुक्ला यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.