स्वर्गीय स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना संगीतमय भावपूर्ण श्रद्धांजली
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
भारत देशाच्या महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे दि.6 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.आयुष्यभर त्यांनी संगीत क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या दैवी आवाजाने संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जणू काही विश्वाचा स्वर हरवला आहे असेच सर्वांना वाटत आहे. या नितांत प्रेमापोटी स्वर्गीय लता मंगेशकर यांना संगीतमय भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टीने अष्टविनायक कलामंच आवरे तर्फे संगीत रजनी या कार्यक्रमाचे आयोजन आवरे गावातील भोलानाथ मंदिरात करण्यात आले.
प्रास्ताविकात रायगड भूषण गणेश प्रसाद गावंड यांनी लता मंगेशकर यांच्या जीवनातील प्रसंग अतिशय भावूकपणे विषद केले.तसेच मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली.तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद दिले.

यावेळी गणेशप्रसाद गावंड,निकिता म्हात्रे, संदीप गावंड,महेश गावंड, कु.अभिषेक गावंड,कु.सानिया म्हात्रे यांनी लता मंगेशकर यांची गाजलेली मराठी-हिंदी गीते अतिशय सुरेल आवाजात गाऊन जमलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना मधुकर कडू,महेश गावंड, गिरीष भगत,अभिषेक कडू,कु.संचित गावंड यांनी उत्तम संगीत साथ दिली.यावेळी आवरे गावच्या सरपंच श्रीम.निराबाई पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सुधाकर पाटील,गाव अध्यक्ष संजय गावंड, श्रीमती कुमुदिनी गावंड,कौशिक ठाकूर, विद्याधर गावंड,प्रकाश गावंड,अनंत भगत तसेच तालुक्यातील संगीतप्रेमी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नित्यानंद म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी त्रैलोक्य फाउंडेशन आणि आरती सेवा मंडळ यांनी विशेष सहकार्य केले.








Be First to Comment