आ.जयंत पाटील, मा.आ.धैर्यशील पाटील यांची आदरांजली
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते तथा पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार यांचे वडील गफूर महमूद मणियार यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गफूर मणियार यांच्या निधनानंतर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, मा.आ.धैर्यशील पाटील, ऍड:निलिमाताई पाटील, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, शेकाप नेते सुरेशशेठ खैरे आदींसह विविध सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली.
गफूर मणियार सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर होते. याबरोबरच अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांमध्ये ते सहभागी होते. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्यांनी पाली मुस्लिम समाज सदर कमिटीत सतत 10 वर्षं खजिनदार पद सांभाळले.
रायगड जिल्हा मुस्लिम वेल्फेर चा 2017 चा उत्कृष्ट तालुका समाज सेवक पदाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
उर्दू स्कूल कमेटी चे मेंबर म्हणून देखील त्यांनी प्रभावीपणे काम केले. गफूर मणियार हे अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते. सामाजिक चळवळीत वाहून घेतलेल्या मणियार यांचे घर नेहमीच माणसांनी भरलेले दिसते. इतरांविषयी नेहमीच आपुलकी व सहानुभूती जपण्याच्या गुणांमुळे ते सर्वपरिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे. जनमाणसाच्या सुखदुःखात सहभागी होऊन मदतकार्य करण्यात त्यांचा हातखंडा होता.आपल्या मुलांनी समाजकार्यात झोकून देऊन काम करावे अशी इच्छा व मार्गदर्शन ते सतत मुलांना करीत असत. गावांतील सर्वांशीच ते प्रेमाने व आपुलकीने वागत असत. घरी आलेल्या प्रत्येकाचे ते आनंदाने स्वागत व पाहुणचार करीत. त्यांनी अत्यंत आनंदी व स्वच्छंदीपणे आपले जिवन व्यतीत केले. संपुर्ण जिवनभर त्यांनी बंधुभाव जोपासला. शेकापची बुलंद तोफ म्हणून ओळखणारे आरिफ मणियार यांना समाजकार्याची प्रेरणा देखील वडील गफूर मणियार यांच्याकडूनच मिळाली. आपली मुलं समाजकारण व राजकारणात झोकून देऊन काम करतात याचा त्यांना अभिमानच वाटायचा. बहुजन समाजात ते मिसळून जायचे. सामाजिक बांधिलकी जपणारे व सर्वांचे लाडके गफूर मणियार यांचे झालेले दुःखद निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या पछात आरिफ, आशिक, आबीद, अनिस,
अजित मणियार आदी पाच मुले
व पत्नी अमिना असा परिवार आहे.






Be First to Comment