केंद्राई कृषी ग्रामविकास संस्थेच्या कृषी पर्यटन सल्लागार पदी रसिका फाटक यांची निवड
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
केंद्राई कृषी ग्रामविकास संस्थेच्या कृषी पर्यटन सल्लागार पदी सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथील कृषी कन्या रसिका फाटक यांची निवड जाहीर करण्यात आली. सदर नियुक्तीप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंत शिंदे यांनी सांगितले की रसिका पाठक यांनी रायगडसह कोकणात अल्प कालावधीत कृषी क्षेत्रात दैदिप्यमान काम केले आहे. शेती व कृषी पर्यटनाचा दांडगा अनुभव असल्याने सल्लागार म्हणून ते अधिक प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी कुटुंबातील रसिका पाठक या कृषी पदवीधर असून तळागाळातील खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव व शेतकरी वर्गाला ते अत्याधुनिक कृषी पद्धत व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढीसंदर्भात गावागावात जाऊन मोफत मार्गदर्शन करतात.
शासनाच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजना तसेच कृषी योजनांची माहिती जनसामान्य व लाभार्थी घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, माणगाव, आणि खालापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना फलोत्पादन भाजीपाला उत्पादन आणि भातपिकांचे उत्पादन, तसेच गांडूळखत उत्पादन तसेच सेंद्रिय शेतीविषयी प्रत्येक्ष सल्ला देण्याच्या कामात सतत सक्रिय असतात. रसिका पाठक यांनी आजवर अनेक कृषी मेळावे, कृषी शिबिरात शेतकरी व महिलांना मार्गदर्शन केले. कृषी शिक्षणाबरोबरच आदिवासी शेतकरी महिलांना आरोग्य, पोषण, रोजगार, मनरेगा याविषयी प्रत्येक्ष मार्गदर्शन करतात. शेतात स्वतः राबून कृषी उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान व प्रयोग करून त्यांनी हरित क्रांतीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावला आहे.
तरुणांनी शेतीकडे लक्ष केंद्रित करून आधुनिक कृषी पद्धतीचा अवलंब करून सधन शेतकरी बनावे. आता संस्थेने ग्रामविकास, स्वछता अभियान,प्लॅस्टिक मुक्ती, जलसिंचन, आदी कामे करण्याचा संकल्प केला आहे. हे उपक्रम देखील कोकणात मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी काम करणार. - रसिका पाठक






Be First to Comment