मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील सर्व्हिसरोडच्या जोडरस्त्याचा चढ एलऍंण्डटीने कापला
पोलादपूर नगरपंचायतीच्या सत्ताधारी विरोधकांचे सोशलमिडीयावर दावे प्रतिदावे
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अंडरपासचे काम अद्याप अपूर्ण असून पश्चिमेकडील सर्व्हिस रोडचे काम खुपच धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे पुर्वेकडील सर्व्हिसरोडवरूनच सध्याचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुहेरी वाहतुकीचा प्रवास धीम्यागतीने सुरू असतो. यामुळे या पुर्वेकडील सर्व्हिसरोडच्या आनंदनगर व भैरवनाथनगरच्या जोडरस्त्याचा चढ ठेकेदार एलऍंण्डटी कंपनीने काही नागरिकांच्या सुचनेवरून कमी केला. यानंतर आधी विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी आणि नंतर सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी या जोडरस्त्याठिकाणी जाऊन फोटोसेशन करून सोशलमिडीयावरून या कामाच्या श्रेयासाठी दावे आणि प्रतिदावे सुरू केले. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुक प्रचारादरम्यान कोटयवधीच्या विकासकामांच्या चर्चा करणाऱ्या या नगरसेवकांनी त्या विकासकामांचा पाठपुरावा करण्याऐवजी एलऍंण्डटी कंपनीने केलेल्या केवळ 75 मीटर रस्त्याचा चढ कापण्याच्या कामावर हे नगरसेवक एवढा गदारोळ का करीत आहेत, याबाबत पोलादपूरकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील अंडरपास रोडवरील सर्व पाचही पुलांचे केंद्रीकरण छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयापासून सैनिकनगर गोकुळनगर रस्त्यापर्यंत झाले असताना खरेदीविक्री संघ आणि पोलादपूर पंचायत समिती तसेच श्रीकाळभैरवनाथमंदिर व रयत विद्यामंदिरपर्यंत जाण्यासाठी कोणताही पुल मंजूर अथवा उपलब्ध झालेला नाही.
या अंडरपास महामार्गाच्या पुर्वेकडील सर्व्हिसरोडवर प्रभातनगर पूर्वसह भैरवनाथनगरकडे जाणारा रस्ता, आनंदनगर भैरवनाथनगरकडे जाणारा रस्ता, नगरसेवक स्वप्नील भुवड यांच्याकडे जाणारा रस्ता, पोलादपूर एस.टी.स्थानकाकडे जाणारे आत-बाहेर असे दोन रस्ते तसेच डॉ.सुकाळे यांच्या हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता असे सहा रस्ते जोडलेले आहेत. यापैकी डॉ.समीर साळुंखे यांच्या घरासमोरून जाणाऱ्या जोडरस्त्यावरून पूर्वेकडील सर्व्हिसरोडवर येणारी वाहने अचानक मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांसमोर येत असल्याने वाहतुकीची कोंडी तसेच अपघाताची शक्यता वाढली होती.
यासंदर्भात, गेल्या वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल नगरपंचायत बरखास्तीमुळे झाली नव्हती. नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे या जोडरस्त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नसताना वाहतुकीच्या कोंडीसह अपघाताच्या शक्यतेत दिवसेंदिवस वाढ झालेली दिसून आली.
मात्र, नगरपंचायतीच्या स्विकृत सदस्यांच्या निवडीच्या आधीच्या दिवशी काँग्रेसकडून नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांसोबत भैरवनाथनगर सहाणेकडील या जोडरस्त्याच्या पुर्वेकडील सर्व्हिसरोडजवळ छायाचित्र काढून पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील भैरवनाथनगर तसेच आनंद व सहाणेकडे जाणाऱ्या रस्ता गेली 2 वर्षे वाहन चालकाना खुप मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. याचा यशस्वी पाठपुरावा करून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले. त्यावेळी नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवड, निखिल कापडेकर, शहर अध्यक्ष अमोल भुवड, भैरवनाथनगर अध्यक्ष संतोष चिकणे, स्थानिक रहिवासी विजय पवार उपस्थित होते. असा मेसेज सोशल मिडीयावरून व्हायरल करण्यात आला.
यानंतर थोडयाच वेळात प्रभाग क्रमांक 5च्या नगरसेविका स्नेहा मेहता यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला तीव्र उतार कमी करून नागरिकांना होणारा धोका कमी करावा, अशी मागणी केली होती, अशा उल्लेखासह सत्ताधारी शिवसेनेतर्फे नगराध्यक्षा सोनल गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार तसेच गटनेते मनोज प्रजापती सदर ठिकाणीच्या कामाची पाहणी केली नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. असा उल्लेख सोशल मिडीयावरील पोस्टवर दिसून आला.
पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान तीन कोटी, आठ कोटी, आमचा निधी आणि महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या निधीचा उल्लेख करून ज्या असंख्य विकासकामांचा उल्लेख सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने केला होता. तो केवळ एलऍंडटी या ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करून केलेल्या चढ कमी करण्याच्या कामापुरताच असावा, अशा तऱ्हेने सोशल मिडीयावरून काही तास हे श्रेयवादाचे युध्द पेटलेले दिसून आले.
पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतांची आकडेवारी अधिक असल्याचे दिसून येत असताना विरोधी पक्षांनाही मतदारांच्या भावनांचा आदर ठेवता आला नसल्याने आता या केवळ 50-75 मीटर रस्त्याचा तीव्र उतार अथवा चढ कमी करण्याच्या कामाचे श्रेयवादाचे सोशलमिडीयावरील युध्द पोलादपूरकर नागरिकांच्या भुवया यालाच विकासकामे म्हणतात काय, या उपहासपूर्ण शंकेने उंचावल्याचे दिसून आले.








Be First to Comment