Press "Enter" to skip to content

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.कॉम., बीसीए, एमसीए, एमबीएचे ऑनलाइन शिक्षणक्रम


२०२६-२७ पासून ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात; व्हिडीओ, प्रश्नावली व मेंटॉरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पनवेल, दि.१८ (वार्ताहर) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बी.कॉम., बीसीए तसेच एमसीए आणि एमबीए हे पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मान्यतेनुसार हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत. बी.कॉम. (UG01) आणि बीसीए (UGP06) हे पदवी अभ्यासक्रम, तर एमसीए (PGP01) आणि एमबीए (P130) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिटनुसार शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. एका क्रेडिटसाठी सुमारे १५० व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक व्हिडीओचा कालावधी ७ ते १० मिनिटांचा असेल. विद्यार्थ्याने व्हिडीओचा अभ्यास केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्नावली सोडवावी लागणार आहे. प्रश्नावलीत उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील व्हिडीओचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर नियुक्त करण्यात येणार आहे. व्हॉट्सॲप ग्रुप आणि ई-मेलच्या माध्यमातून मेंटॉर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टर-बेस्ड पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

मुक्त विद्यापीठामार्फत यापूर्वीपासूनच राज्यभरातील विविध अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जात आहेत. ऑनलाइन शिक्षणक्रमांच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना अधिक सुलभ पद्धतीने उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या शैक्षणिक संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपला शैक्षणिक स्तर उंचावावा, असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.