शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश पवार व काँग्रेसचे संतोष चव्हाण स्विकृत नगरसेवक
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया स्विकृत सदस्य पदांच्या निवडीने पूर्णत्वास गेली असून शिवसेनेकडून शहरप्रमुख सुरेश पवार तर काँग्रेसकडून संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही नवनिर्वाचित स्विकृत सदस्यांनी यापूर्वी लढविलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करला असून पक्षासाठी दिलेल्या योगदानासाठी निष्ठावंत म्हणून ही निवड झाल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून 12 नगरसेवक निवडून आल्याने राजन पाटणकर आणि काँग्रेस पक्षाकडून 5 नगरसेवक निवडून आल्याने लक्ष्मण पां.जगताप यांना स्विकृत सदस्यपदी निवडण्यात आले होते. शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश पवार यांना प्रभाग 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित खेडेकर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस उमेदवार सुभाष गायकवाड यांच्याविरोधात थोडक्यात पराभव पत्करावा लागला. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुभाष गायकवाड यांना 114 मते तर शिवसेनेचे सुरेश पवार यांना 100 मते मिळाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित खेडेकर यांना 41 मते मिळाल्याने सुरेश पवार यांचा पराभव झाल्याचे मानले गेले. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग 17 मध्ये दिलीप भागवत यांना 80 मते मिळाली तर शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश पवार यांना 71 मते मिळाली. याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दर्पण दरेकर यांना 46 मते मिळाली. या निवडणुकीवेळीही शहरप्रमुख सुरेश पवार यांचा केवळ 9 मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे शहरप्रमुख असलेल्या सुरेश पवार यांना आ.भरत गोगावले यांनी दर्शविलेल्या विश्वासामुळे स्विकृत सदस्यपदी निवड करण्याचे ठरविण्यात आले.

मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 5 सदस्यांपैकी काँग्रेसचे विरोधी गटनेते नागेश पवार यांनी विकासकामे करता येत नसल्याच्या नाराजीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका शुभांगी चव्हाण यांना विरोधी गटनेतेपदाची धुरा सांभाळावी लागली. काँग्रेस नगरसेवक नागेश पवार यांच्या राजिनाम्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या संतोष चव्हाण यांचा पराभव झाला. त्यावेळी नागेश पवार यांना 66 मते तर संतोष चव्हाण यांना 58 मते मिळाली होती. यानंतर काँग्रेसची सदस्यसंख्या कमी झाली. यामुळे काँग्रेसची टक्केवारीदेखील कमी होऊन लक्ष्मण जगताप यांचे स्विकृत सदस्यपद हे टक्केवारीच्या निकषाप्रमाणे घटले. मात्र, शिवसेनेने दुसऱ्या स्विकृत सदस्याची निवड करण्याचे टाळले. यावेळी पोलादपूर शहरामध्ये सर्वात चर्चेची ठरलेल्या प्रभाग 10 मधील लढतीत शिवसेनेचे प्रसाद इंगवले यांनी 123 मते मिळवून काँग्रेसच्या माजी विरोधीपक्षनेत्या शुभांगी चव्हाण 110 मते यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव केला. याठिकाणी भाजपचे प्रतीक सुर्वे यांना 13 मते मिळाली. याठिकाणी शिवसेनेचे प्रसाद इंगवले यांना निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी चव्हाण यांच्यापेक्षा 13 मते अधिक मिळाली. मागील पोटनिवडणुकीमध्ये संतोष चव्हाण आणि या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये झालेल्या शुभांगी चव्हाण यांच्या पराभवामुळे काँग्रेस पक्षाकडून याच कुटूंबाकडे स्विकृत सदस्यपद देण्याचा निर्णय होऊन संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली.
स्विकृत सदस्यपदी निवड झालेल्या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांना पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील सर्व 17 प्रभागांतील समस्या मांडण्याचा आणि सोडविण्याचा अधिकार असून शहरप्रमुख सुरेश पवार यांच्याप्रमाणेच संतोष चव्हाण यांच्या निवडीनंतर विशेष समाधान व्यक्त होत आहे.








Be First to Comment