नागोठणे पोलिस ठाण्यात तक्रार : कारवाईची मागणी
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठण्याजवळील आमडोशी येथील जागृत देवस्थान श्री माणकेश्वर महाराज देवस्थान मंदिरा संदर्भात फेसबुक या सोशल मिडियावर विटंबना केल्या प्रकरणी आमडोशी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमडोशी ग्रामस्थांकडून नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी रोहा पंचायत समितीचे सदस्य व आमडोशी गावातील ग्रामस्थ संजय भोसले, रोहा तालुका भाजपचे अध्यक्ष सोपान जांबेकर, एकनाथ जांबेकर, ह.भ.प गजानन बलकावडे, प्रमोद जांबेकर, प्रकाश रेवाळे, विनोद जाधव, सुरेंद्र जांबेकर, गणेश जाधव, संदिप बलकावडे, प्रशांत कामथे, अमित जांबेकर, अजिंक्य जांबेकर आदींसह आमडोशीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठणे पोलिस ठाण्यास देण्यात आलेल्या निवेदनात आमडोशी ग्रामस्थांनी म्हटले आहे की, मोहन भोईर या व्यक्तीने ही पोस्ट काही दिवसांपूर्वी फेसबुक या सोशल मिडियावर टाकली असून त्या पोस्टवर आनंद गव्हाळे या व्यक्तीने आक्षेपार्ह व ग्रामस्थांच्या भावना दुखावणारे विधान केले आहे. या विधानामुळे आमडोशी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संबधितांवर त्वरित योग्य ती कारवाई करावी. संबधितांवर कारवाई झाली नाही तर आमडोशी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात मार्फत देण्यात आला आहे.






Be First to Comment