Press "Enter" to skip to content

नवी मुंबई व रायगडमध्ये सुरु झाला क्रिकेट फिव्हर !!

क्रिकेट खेळताना हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ

सिटी बेल | ठाणे रायगड  |

कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर नवी मुंबई व रायगड यामध्ये क्रिकेट स्पर्धांना जोर आलं असून शहरातील लहान मोठी मंडळे डे – नाईट क्रिकेट स्पर्धा भरवीत आहेत. आरोग्य क्षेत्रातील एक आकडेवारीनुसार २०२०- २१ मध्ये महाराष्ट्रामध्ये ३० ते ४० तरुणांचा क्रिकेट मैदानावर मृत्यू झाला आहे, त्यामुळे तरुणांनी क्रिकेट खेळताना सावधानता बाळगणे जरुरी आहे. क्रिकेट अथवा इतर कोणतेही स्पर्धात्मक खेळ खेळतांना वैद्यकीय प्रशिक्षक अथवा निरीक्षक असणे जरुरी असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कामोठे येथील क्रिटीकेयर लाइफलाईन हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. अविनाश गुठे  म्हणाले, ” आपण सर्वजणच कोरोनाच्या महामारीतून सावरत आहोत, गेली दोन वर्षे आपण घरामध्ये अडकून राहिलो होतो तर अनेकांना कोरोनाची लागण झाली होती यामध्ये तरुणांचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे कोरोना झालेल्या नागरिकांनी किमान वर्षभर तरी काळजी घेतली पाहिजे.

आजमितीला मुंबईसह  नवी मुंबई, रायगड ठाणे पालघर या लगतच्या शहरांमध्ये क्रिकेटस्पर्धांमध्ये १८ वर्षांपासून ते पन्नाशी पार केलेल्या नागरिकांचा यात थेट सहभाग असतो . खेळत असताना शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे चक्कर येणे , पडल्यामुळे दुखापत होणे तसेच उच्च रक्तदाब वाढल्यामुळे भोवळ येणे असे प्रकार मैदानात होत असतात, अशावेळी तात्काळ उपचार करणे फार गरजेचे असते.

अनेकवेळा चक्कर आल्यावर त्या खेळाडूला सावलीत बसविले जाते अथवा तंबूमध्ये आराम करण्यास सांगितले जाते परंतु असे करणे चुकीचे आहे.  तिशीच्या तरुणांमध्ये हृद्यविकार वाढत असून त्यामागची कारणे ही आजच्या विसंगत जीवनशैलीमध्ये सापडतात. मुखत्वे खाण्याच्या व झोपण्याच्या वेळेत झालेला कमालीचा बदल शारीरिक व मानसिक ताणतणाव वाढण्यास कारणीभूत ठरतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह व उच्च रक्तदाब चोर पावलांनी शरीरात शिरल्यावर हृदयविकार होण्याचा धोका अधिक वाढतो.

जेंव्हा मैदानात खेळ सुरु असताना तेथील स्पर्धेच्या वातावरणामुळे शरीरातील रक्तदाब हा वाढलेला असतो अशा वेळी ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्या खेळाडूचे  हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात अशावेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे असते.”

दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते हीच विश्रांती झोपेच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजेच शरीर आरोग्यदायी ठेवण्यात झोपेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते; पण काही लोक रोज प्रमाणापेक्षा जास्त, तर काही जण कमी झोप घेत असतात याचा परिणाम मात्र त्यांच्या आरोग्यावर होत असतो.रोज सात तासांपेक्षा कमी अथवा जास्त झोपेचा  थेट संबंध हृदयाच्या तारुण्याशी येतो. जी तरुण मंडळी रोज सात तासांपेक्षा कमी झोप घेते  त्यांचे हृदय वृद्धत्वाकडे जात असल्याचे  अमेरिकेतील जॉर्जियामधील ‘इमोरी युनिव्हर्सिटी’तील संशोधनात दिसून आले आहे.

सततचा मानसिक ताणतणाव, बिघडलेली आर्थिक गणिते, नात्यांमधील दुरावा व सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहता भविष्यात हृद्यविकार वाढण्याची शक्यता असून रोजच्या जीवनशैलीमध्ये तत्काळ बदल करणे गरजेचे आहे असे मत क्रिटीकेयर लाइफलाईन हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. अविनाश गुठे यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.