चौक मोर्बे पुनर्वसन गावात जाणारा रस्ता झाला गायब
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
चौक मोर्बे प्रकल्पग्रत वसाहतींकडे जाणारा रस्ता गायब झाल्याने प्रकल्पग्रस्त यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे, याची वेळीच दखल न घेतल्यास ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
नवीमुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचे असलेले व रायगड जिल्ह्यातील खालापूर चौक मोर्बे हे धरण नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्र व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे व खारघर यांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. मोर्बे धरणग्रस्त वसाहती बोरगाव बु.,वरोसे बौद्धवाडा,वरोसे,वरोसेवाडी, उंबरणे व कातकरीवाडी,आरकस व पिरकट वाडी ह्या ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली हद्दीत नढाळ या महसुली गावात स. नं.४,५,८ ते ११,१५ ते १८ व २२ मध्ये १६-४६-५ एवढया क्षेत्रात वसाहती करून राहिल्या आहेत, अजूनही नागरी सुविधा व नोकरी, रोजगार साठी लढा सुरूच आहे.या वसाहती मधील लोकांना दळणवळणसाठी जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ येथुन १२ मीटर रुंदीचा रस्ता या वसाहतींकडे जातो,असे नकाशा पाहिल्यावर कळते.

या रस्त्याच्या एका बाजूला पेट्रोल-डिझेल चा पंप व दुसऱ्या बाजूला स्थानिक यांची दुकाने आहेत.वरोसे वाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक कार्यक्रमाचे बॅनर या रस्त्याच्या कडेला कुणालाही अडचण होणार नाही, अशा पद्धतीने लावण्यात आले होते.पण कोणी हे बॅनर काढून बाजूला केल्याने वादाला तोंड फुटले.त्यांचे म्हणणे आहे की हा रस्ता त्यांच्या मालकीचा आहे.मग नकाशात दाखविलेला १२ मीटर रुंदीचा रस्ता कुणी चोरला.? असा प्रश्न ग्रामस्थ व लोकनेते मारुती तवले यांनी विचारला असून याबाबत ग्रुप ग्रामपंचायत लोधिवलीच्या प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांना लेखी तक्रार दाखल केली आहे.
जुना मुंबई-पुणे रस्ता ते पुनर्वसन वसाहतींना जोडणारा रस्ता म्हणून नकाशात याचा उल्लेख आहे. या रस्त्यावर कुणीही अतिक्रमण केले असल्यास त्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे,अशी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे.याबाबत आपण जिल्हाधिकारी रायगड,खालापूर तहसीलदार व नविमुंबई महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करणार असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.








Be First to Comment