जिल्हा परिषदेच्याअर्थसंकल्पात तरतुद करून उमटे धरणाचा गाळ तात्काळ काढा
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ९६ गावातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या उमटे धरण गाळाने भरले आहे, सदरचे धरण हे रायगड जिल्हापरीषदेच्या अखत्यारीत येते,त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी विशेष निधीची तरतूद करून गाळ काढून नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भात तरुण सामाजिक कार्यकर्ते अँड,राकेश नारायण पाटील यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,तसेच पालकमंत्री,स्थानिक आमदार महेंद्र दळवी, आमदार जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात अँड राकेश पाटील म्हणतात की,मागच्या वर्षीच्या मे महिन्यांत सर्वात गंभीर प्रश्न हा उमटे धरणाच्या गाळाच्या संदर्भात होता. उमटे धरणाचा गाळ काढून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मुबलक व शुद्ध पाणी देण्याच्या बाबतीत मी आपल्या कार्यालयात दि.11/5/2021 रोजी अर्जही दिला होता. मात्र आपण आजपावेतो उत्तरच दिलेले नाहीत, ही शोकांतिका आहे.
उमटे धरण हे मागील कित्येक वर्षांपासून गाळाने भरल्यामुळे पावसाळी नागरिकांना चिखलमिश्रीत पाणी तुम्ही पाजता. पावसाळयात माती मिश्रित पाणी प्यायल्यामुळे येथील नागरिकांना कावीळ तसेच इतर रोगांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी मी दिलेल्या तक्रार अर्जावर अलिबागच्या पत्रकार बंधूंनी उमटे धरणाचा विषय गांभीर्याने घेतल्यामुळे स्थानिक आमदार तसेच मा. खासदार साहेबांनी गाळ काढण्याच्या संदर्भात हालचाली केल्या परंतु पाऊस पडला आणि गाळ आजही तसाच राहिला आहे.

उमटे धरण हे जलसंपदा विभागाकडे नाही ते आपल्या अधिकारक्षेत्रांत आहे. आपली रायगड जिल्हा परिषद दरवर्षी 100 कोटींच्या वर अर्थसंकल्प मांडते. आपण येत्या सन 2022-23 च्या जिल्हापरिषदेच्या अर्थ संकल्पात उमटे धरणाचा गाळ काढण्याच्या संदर्भात विशेष निधीची तरतुद करावी. तसेच मे महिन्याच्या अखेरीस उमटे धरणाचा गाळ काढण्याचा दिखावा न करता 1 एप्रिल 2022 पासून गाळ काढण्यासाठी सुरुवात करावी.
सध्या फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा सुरु झाला असतानाही उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहणार्या नागरिकांना 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. मग मे आणि जून महिन्याच काय? मग 96 गावांना दुष्काळग्रस्त गावं म्हणून जाहिर करणार का ? आपण माझ्या अर्जाची उमटे धरणाच्या गाळाच्या तसेच पाण्याच्या प्रश्नांवर गांभीर्याने दखल घेवून तात्काळ कारवाईस सुरुवात करावी. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्या 96 गावांच्या नागरिकांचा आपल्या विरोधात असंतोष खदखदत आहे. आपण सदरच्या अर्जावर तात्काळ कारवाई न केल्यास आपल्याला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व त्याला आपण स्वतःच जबाबदार राहणार आहात याची कृपया नोंद घ्यावी.
सध्या फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा सुरु असताना 2 दिवसा आड उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातोय,मग मे आणि जून महिन्यात काय ? त्यामुळे उमटे धरणाच्या गाळाच्या संदर्भात जिल्हाप्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या हक्कापासून वंचीत ठेवू नये. – अँड. राकेश पाटील








Be First to Comment