ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कर्षासाठी बचतगटांना प्रशिक्षण देण्याची गरज — सुधाकर घारे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
‘ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट आहेत. त्यांचे कामही चांगले आहे. मात्र आर्थिक उलाढालीत त्यांना फसविण्याचे प्रकार होत आहेत. ते रोखण्यासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी या महिला बचत गटातील सर्व सदस्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतींमधील सेस फंड वापरला जात नाही. त्याचा निधी तसाच पडून आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या बैठका बोलवून त्यांना त्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. तरीही निधी वापरला गेला नाही तर तो महिला बचत गटांना कसा देता येईल? याबाबत विचार करणे गरजेचे आहे.’ असे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सूचित केले.

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग सेस फंड 2019 ते 2022 मधून महिला बचत गटांना साहित्य वाटप समारंभाचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. सुधाकर घारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सभापती सुषमा ठाकरे, उपसभापती जयवंती हिंदोळा, जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले, सहारा कोळंबे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, सुजाता मनवे, पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख, बळीराम देशमुख, अतिरिक्त गट विकास अधिकारी सी. एस. रजपूत आदी उपस्थित होते.

गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी स्वागत केले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश कथन केला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष ऍड. रंजना धुळे यांनी, ‘पूर्वी महिला म्हणजे चूल आणि मूल यामध्येच गुरफटल्या होत्या. त्यावेळी काही आर्थिक अडचण आल्यास सावकाराचे दार ठोकावे लागत आहे. आता त्यात आमूलाग्र बदल झाला असून महिला बँकेचा दरवाजा ठोठावत आहेत.’ असे स्पष्ट केले. त्यानंतर प्रकल्प एक मधील 47 तर प्रकल्प दोन मधील 42 महिला बचत गटांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पापड मशीन, दळण मशीन, मत्स्यकीट, भजनाचे साहित्य यांचा समावेश होता. सूत्रसंचालन अनिता ढमढेरे यांनी केले. याप्रसंगी सरपंच प्रभावती लोभी, वंदना थोरवे, पिंगळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल खंत व्यक्त करून उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ‘हा कार्यक्रम स्थगित करून नंतर घ्यावा.’ असे सूचित करून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर मात्र कार्यक्रम नियोजनबद्ध पार पडला.








Be First to Comment