शिवसेनेच्या सोनल गायकवाड नगराध्यक्षा तर नागेश पवार उपनगराध्यक्ष
काँग्रेसने नगरसेविका आशा गायकवाड यांचा अर्ज मागे घेऊनही महाआघाडीचा चमत्कार घडलाच नाही
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीनंतर पूर्णत्वास गेली आहे. बहुमत असलेल्या शिवसेनेच्या सोनल गायकवाड यांची नगराध्यक्षपदी आणि माजी नगराध्यक्ष नागेश पवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने बुधवारी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आशा गायकवाड यांनी माघार घेऊनही महाआघाडीचा चमत्कार घडलाच नसल्याचे आज दिसून आले.
पोलादपूर नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्याच्या 13 जागापैकी 7 जागा शिवसेनेला आणि 6 जागा काँग्रेसला मिळाल्या तर दुसऱ्या टप्प्यातील 4 जागांपैकी 1 जागा भाजपाला आणि 3 जागा शिवसेनेला मिळून शिवसेनेची निर्विवाद सत्ता स्थापन होण्याची चिन्हे दिसून येऊ लागली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी आरक्षण सर्वसाधारण महिला जाहिर झाल्यानंतर शिवसेनेकडून सोनल गायकवाड यांचा अर्ज दाखल होणार म्हणून नामसाधर्म्यातून आशा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल करण्यात आला.
दोन्ही नगराध्यक्षपदाच्या दावेदार नगरसेविका एकाच समाजाच्या आणि नवोदित असताना काही नगरसेवकांच्या शैक्षणिक आणि बौध्दीक कुवतीमुळे गायकवाड या आडनावासोबतचे नांव वाचूनही आवाजी मतदानावेळी गोंधळ निर्माण होऊन शिवसेनेची सत्ता असूनही नजरचुकीने सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली.

यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींची वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदार आशा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे स्वरूप बिनविरोध निश्चित झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकदेखील बिनविरोध झाली. त्यामुळे शिवसेनेचे 10 नगरसेवकांमुळे निर्विवाद बहुमत असल्याने काँग्रेस पक्षाने या निवडणुकीवेळी स्वारस्य न दाखविता नवनिर्वाचित नगराध्यक्षा सोनल गायकवाड आणि नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नागेश पवार यांना शुभेच्छा देण्याची विधायक विरोधकांची भुमिका पार पाडली.
शिवसेनेतर्फे नगराध्यक्षा सोनल गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, सुनिता पार्टे, अस्मिता पवार, स्नेहा मेहता, शिल्पा दरेकर, विनायक दिक्षित, मनोज प्रजापती, प्रसाद इंगवले, सिध्देश शेठ असे 10 नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे दिलीप भागवत, आशा गायकवाड, तेजश्री गरूड, श्रावणी शहा, स्वप्नील भुवड आणि निखिल कापडेकर असे 6 नगरसेवक असून भारतीय जनता पक्षाच्या अंकिता जांभळेकर निकम या एकमेव नगरसेविका निवडून आल्या आहेत.
शिवसेनेतर्फे राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, शहरप्रमुख सुरेश पवार, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, माजी उपनगराध्यक्ष उमेश पवार हे उपस्थित होते. नगराध्यक्षा सोनल गायकवाड आणि उपनगराध्यक्ष नागेश पवार यांचे अभिनंदन महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयाला अभिवादन करून केले.








Be First to Comment