कर्जत रेल्वे स्थानक प्रशासनाचा हलगर्जीपणा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत रेल्वे स्थानक प्रशासनातील उद्घोषणा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकदा रेल्वे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असते. वारंवार तक्रार करुन देखील उद्घोषणा विभागाच्या कामकाजात काहीही सुधारणा होताना दिसुन येत नाही. उद्घोषणा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे भविष्यात एखाद्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासी मृत झाल्यावरच उद्घोषणा विभागा सुधारेल का ? अशी चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये होत आहे.

आज सकाळी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन व तीनवर मालगाड्या उभ्या होत्या. खोपोली वरुन मुंबई दिशेकडे जाणारी 9.06 वाजताची लोकल नेहमी फलाट क्रमांक तीनवर येत असल्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशी फलाट क्रमांक दोन व तीनवर लोकलची वाट पहात उभे होते. खोपोली वरुन येणा-या मुंबई लोकलची वेळ होऊन गेली तरी मालगाड्या फलाटांवरच उभ्या होत्या आणि कर्जत रेल्वे स्थानकातील उद्घोषणा विभागाकडुन कोणत्याही प्रकारची उद्घोषणा होत नव्हती. त्यानंतर थोड्याच वेळात खोपोली वरुन मुंबई दिशेकडे येणारी लोकल आली आणि त्यानंतर म्हणजेच 9 वाजुन 11 मिनिटांनी कर्जत रेल्वे स्थानकातील उद्घोषणा विभागाला जाग आल्यावर त्यांनी उद्घोषणा केली की, खोपोली वरुन मुंबई दिशेकडे जाणारी लोकल फलाट क्रमांक एकवर येणार आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन व तीनवर उभ्या असलेल्या रेल्वे प्रवाशांची खुपच धावपळ उडाली.

फलाटाच्या शेवटच्या टोकाला असणा-या पादचारी पुलापर्यंत धावत पळत जाऊन पुन्हा फलाट क्रमांक एकवर प्रवाशांना यावं लागल्यामुळे सर्वच प्रवाशांची खुपचं दमछाक झाली. तसेच काही लहान मुलांसह प्रवास करणारे कुटुंब व वयोवृद्ध प्रवाशांनी ह्या लोकलने प्रवास करण्याचे टाळले.
अशा प्रकारे केवळ एक दोन मिनिटे अगोदर उद्घोषणा करणा-या कर्जत रेल्वे स्थानकातील उद्घोषणा विभागाच्या हलगर्जीपणामुळे रेल्वे प्रवाशांना खुपच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. तरी, रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा भविष्यात एखाद्या रेल्वे प्रवाशास आपला जीव गमावावा लागेल अशी प्रतिक्रिया कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन सचिव प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली.








Be First to Comment