Press "Enter" to skip to content

मोटारसायकल स्वाराचा अंत

पोलादपूरनजिक रानबाजिरे गावाच्या हद्दीमध्ये ट्रकला ओव्हरटेक करताना अपघात

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कापडे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे गांवाच्या तीव्र वळण उतारावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलच्या झालेल्या अपघातानंतर जखमी अवस्थेत प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी अंत झाला आहे. अपघात झाल्यानंतर काही वेळातच तरूणाची प्राणज्योत मालवली.

पोलादपूर शहरानजिक कापडे बाजूकडून पोलादपूरच्या दिशेने निलेश कृष्णा सुतार (30,साखर-सुतारवाडी, ता.पोलादपूर) रानबाजिरे गावाच्या हद्दीत सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने मोटारसायकल चालवित आला. यावेळी ट्रक क्रमांक एमएच 04 केएफ 0607 पोलादपूरच्या दिशेने जात असताना निलेश कृष्णा सुतार याने मोटारसायकलचा वेग कमी न करताच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दगडाला मोटारसायकलची ठोकर मारून वाहनाच्या नुकसानीस तसेच स्वत:च्या शरीराला छोटया मोठया जखमा होऊन मृत्यूस कारणीभूत ठरला.

याप्रसंगी सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि जखमीवर तातडीने उपचार करण्यासाठी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात पाठविले. यानंतर जखमीला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी महाडला पाठविले असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत निलेश सुतार याच्याविरूध्द भा.द.वि.सं. 279,337, 339, 304 तसेच मोटारवाहन कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार भोसले हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.