Press "Enter" to skip to content

गटविकास अधिकारी वाणी यांची माहिती

उसरोली ग्रामपंचायत कार्यलायाला मिळणार नवीन ग्रामसेवक

सिटी बेल | मुरूड-जंजिरा | अमूलकुमार जैन |

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हि नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्वाची ग्रामपंचायत आहे. सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच व सदस्य यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा विकास होत आहे. मात्र येथील ग्रामसेवक हे कायम गैरहजर असणे, त्यांच्याकडून विकासकामांसंबंधी ढिसाळ कारभार आदींमुळे लोकप्रतिनिधी यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवक मधुकर भालदार यांच्या बाबत ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला तेव्हा उसरोली ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन ग्रामसेवक देण्यात येईल अशी माहिती मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांनी दिली आहे.

तेव्हा नव्या ग्रामसेवकांची उसरोली ग्रामपंचायत कार्यलायाला प्रतीक्षा असून गटविकास अधिकारी यांची माहिती सत्यात कधी उतरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुरुड तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या उसरोली ग्रामपंचायत हद्दीत सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील व सहकारी सदस्य यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा विकास जोमात सुरु आहे. काही कामे सुरु असून त्यासह अनेक कामे प्रस्तावित आहेत. मात्र ग्रामपंचायतमध्ये शासकीय अधिकारी म्हणून असलेले ग्रामसेवक यांचे ग्रामपंचायतीला सहकार्य मिळत नसल्याने गेले २ ते ३ महिने विकासाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२ ग्रामपंचायतीचा भार सोसणारे ग्रामसेवक मधुकर भालदार यांना हा भार सोसवेना झाला आहे. उसरोली कार्यालयामध्ये त्यांना सोमवार, बुधवार व शुक्रवार असे वार नेमूण दिले आहेत. परंतु ग्रामसेवक मधुकर हरी भालदार हे दिलेल्या वाराला ग्राम पंचायत कार्यालयमध्ये हजर राहत नाहीत. परिणामी ग्राम पंचायतीच्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होत आहे. अनेक दिवस कार्यालयात गैरहजर असल्याने ग्रामस्थांची कामे अडकत आहेत.

पंचायत समिती कार्यालयाने ग्रामसेवक व सरपंच यांची संयुक्त सभा घेतून १४ वा वित्त आयोग शिल्लक निधी संपविण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच पाणी योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेवून पाणीपट्टी वसुली बाबत सुचना दिलेल्या आहेत. परंतु ग्रामसेवक मधुकर हरी भालदार हे कार्यालयामध्ये येत नसल्याने सदरील १४ वा वित्त आयोग निधी विकास कामांवर खर्च करण्यास अडचण निर्माण झाली आहे.

पाणीपटटीचा विषय देखिल प्रलंबित आहे. १५ वा वित्त आयोग झालेल्या कामाचे देयक हे पब्लिक फायनॅन्शियल मॅनेजमेंट सिस्टम ने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मार्फत अदा केले जातात. परंतू त्यासाठी आवश्यक कागदपत्रे ग्रामसेवक यांच्याकडे नसल्याने १५ वा वित्त आयोग पूर्ण झालेल्या कामांचे ठेकेदाराला देयक अदा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. संबंधीत ठेकेदाराने देयक मिळण्यासाठी ग्राम पंचायतीमध्ये तगादा लावला आहे.

ग्रामस्थांना लागणारे दाखले, असेसमेंट हे वेळेत देता येत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्राम पंचायतीमध्ये दिले गेलेल्या अर्जावर निर्णय न झाल्याने ग्रामस्थांना परत जावे लागत आहे. तर यासगळ्याना स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सामोरे जावे लागत आहे. त्याकरता सरपंच, उपसरपंच यांनी पंचायत समिती कार्यालय मुरुडकडे अनेकदा तक्रार देखील केली. मात्र पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष वाणी हे दखल घेत नसल्याने उसरोली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी गुरुवारी थेट पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालत गटविकास अधिकारी वाणी यांना धारेवर धरले.

तेव्हा २ ते ३ दिवसात नवीन ग्रामसेवक ग्रामपंचायत साठी देत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच याबाबत पत्रव्यवहार वरिष्ठांकडे केला असल्याचे देखील सांगितले. आता नवीन ग्रामसेवक यांची प्रतीक्षा कधी संपते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.