39 वर्षांनंतर भरली अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या 1982 – 83 च्या दहावी इयत्तेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी जणू काही 39 वर्षानंतर शाळाच भरल्यासारखे वाटत होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
वांगणी नजीक असलेल्या दोन परिसरात असलेल्या नदी काठच्या मोरे नर्सरीमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात होऊन गणेशवंदन, सरस्वतीपूजन, मेधा वैद्य, सुनील हरपुडे, स्वाती शिंदे, विनोद राणे, केदार देशक, अनुप मावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर काळाच्या पडद्याआड गेलेल्या मित्रांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी काहीक्षण सगळ्यांचेच डोळे पाणावले. त्याआठवणींतून सावरल्यानंतर एकमेकांना तिळगुळ देऊन संस्कृती जपण्याचा आनंद घेत घेत,तिळगुळाप्रमाणे नेहमीच एकजूटीने रहाण्याची नकळतच शपथ घेतल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. मित्र – मैत्रिणींची एक मजेशीर ओळखपरेड झाली. 39 वर्षानंतर भेटलेल्या काही माजी विद्यार्थ्यांना ओळखण्याचा छान पैकी सफल प्रयत्न केला.
मोरे नर्सरीच्या प्रशस्त प्रांगणात असलेले झोपाळे, घसरगुंडी पाहून सारे जण बालपणात हरवले आणि सगळ्यांनी किती आनंद घेतला. स्नेह संमेलनामधे जणू काही छोटी सहलच झाली. अशी भावना सर्वांच्याच चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. मोरे नर्सरीचा परिसर एवढा भव्य व निसर्गरम्य आहे की, तेथील गुलाबबाग, तळ्यातील घर, प्रशस्त रोपवाटिका व खळखळत्या नदीच्या परिसराची छानपैकी भटकंती एकमेकांशी गप्पा, हशा, विनोद , चेष्टामस्करी करत किती वेळ झाली हे कळलच नाही. या सर्व क्षणांची आठवण रहावी म्हणून ड्रोन कॅमेरा सर्व क्षण टीपत होता.
स्वादिष्ट समिष स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला भोजनानंतर पुन्हा गप्पा रंगल्या, गाणी गाण्याची हौसही भागवून घेतली. गाण्यांच्या भेंड्या, भाऊजीचा खेळ झाला. मजेशीर खेळांनी अजूनच रंगत वाढली. मनोगतांनी नवे विचार कळले. सरते शेवटी दरवर्षी नक्की भेटायचं,तसेच समाजोपयोगी काम करण्याबाबत, लवकरच एक ठाम योजना आखायची तसेच सभासदांपैकी कोणाकडे अचानक अडचण उद्भवल्यास त्यासाठी एक ठराविक निधी कायमस्वरूपी जमा करणे याबाबत नक्कीच विचार करून अंमलात आणण्याचे ठरले. दिनेश जैन यांनी आभार प्रदर्शन केले. संध्याकाळ झाल्याने नाईलाजाने काढते पाय घेत गाड्या निघाल्या पुणे, खोपोली, पेण, वावोशी, कर्जत, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुलुंड वाशीकडे एक अविस्मरणीय आठवण घेऊन.








Be First to Comment