Press "Enter" to skip to content

जेएसडब्ल्यूच्या विरोधात पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार

वायू आणि जलप्रदुषणानंतर आता ध्वनी प्रदुषणाचा त्रास, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष : माजी आमदार पंडित पाटील यांनी केली तक्रार

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात वायू आणि जलप्रदुषणाबाबत मोठया प्रमाणावर तक्रारी केल्या जात असतानाच आता शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी जेएसडब्ल्यू कंपनीकडून होत असलेल्या ध्वनी प्रदुषणाविरोधात पोयनाड पोलिस विरोधात तक्रार करीत कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तीनही प्रकारचे प्रदुषण होत असतानाही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काय करत आहेत असा सवाल देखील पंडीत पाटील यांनी केला आहे.

माजी आमदार पंडित पाटील यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, जे.एस.डब्ल्यु कंपनीतुन मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. तसेच कंपनीचे रासायनिक सांडपाणी धरमतर खाडीमध्ये सोडले जाते. त्यामुळे खाडीचे पाणी दुषित होऊन त्यामुळे मच्छीमारीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यात आणखी भर म्हणुन मागील महिन्याभरापासुन कंपनीच्या प्लांटमधून मोठा आवाज येत आहे. या आवाजामुळे या परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे.

याबाबत कंपनी प्रशासनाला विचारणा केली असता कंपनीचे प्रशासकीय अधिकारी हेतु पुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कंपनीतुन होणारे प्रदुषण टाळण्यासाठी कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे. जेएसडब्ल्यू ही पोलाद निर्मितीची कंपनी असताना त्यांनी येथे ऊर्जा प्रकल्प सुरु करत आहे.

यासंदर्भातील कोणती जनसुनावणी घेण्यात आली होती का असा सवालही पंडित पाटील यांनी केला आहे. स्टील प्लाँटमध्ये ऊर्जा प्रकल्प घेताना सर्वप्रकारच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत का असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. जनतेला छोटया छोटया कारणांवरुन त्रास देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांना जेएसडब्ल्यू सारख्या कंपनीच्या प्रदुषणाबाबत का दुर्लक्ष केले जात आहे. जेएसडब्ल्यू कंपनीला लोकांच्या आरोग्याच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही पंडित पाटील यांनी केला आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच शासनाचे इतर अधिकारी या कंपनी विरोधात कारवाईचे नाटक करुन थातूर मातूर कार्यवाही करुन शांत बसत असल्याचा आरोपही पंडित पाटील यांनी केला आहे.

पोयनाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर तक्रार अर्ज पेण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.