Press "Enter" to skip to content

नारंगी ग्रामपंचायतीच्या वास्तुचे उद्घाटन, आस विद्यालय अ‍ॅपचा शुभारंभ

खारेपाटात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार : आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

आगरी समाज आणि रायगडचा शैक्षणिक विकास ना.ना.पाटील यांनी केला आहे. तीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. त्याच दृष्टीकोनातून खारेपाटात चांगल्या दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करायच्या आहेत असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. खारेपाटातील नारंगी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वास्तूचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते अ‍ॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, मारुती पाटील, नारंगीच्या सरपंच स्मिता पाटील, उपसरपंच अमोल पाटील,नारंगी आस विद्यालयाचे हितचिंतक अशोक हिरामत, चित्रलेखा हिरामत, विकास काकवानी, लिना काकवानी, पेझारीचे उपसरपंच अ‍ॅड मनोज धुमाळ, गटविकास अधिकारी साळावकर, माजी सभापती कुंदा गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरहरी म्हात्रे, तसेच झी न्युजच्या निवेदिका रिद्धी प्रसाद म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आ. जयंत पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, खारेपाटाचा एक वेगळा इतिहास आहे. सदैव स्फुर्ती देणारा असा हा खारेपाट आहे. आगरी समाज आहे त्या ठिकाणी विकासाचे वेगळे चित्र दिसते. रायगडच्या आगरी समाजाची इंगजांमध्ये देखील दहशत होती. म्हणूनच इंग्रज रायगडकडे फिरकले देखील नाहीत. या समाजाकडे बुद्धीमत्ता आहे, आक्रमकता आहे. नारंगी ग्रामपंचायतीच्या टिमचे काम उत्कृष्ट चालले असून. मला अभिप्रेत असणारे काम होत असल्याने समाधान वाटते. त्यामुळे मी नारंगीसाठी दुप्पट निधी देईन अशी ग्वाही त्यांनी दिली. नारंगी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचे खरे श्रेय हे दातार काकांचे आहे. काम करणार्‍यांकडून चुका होतात. पण प्रामाणिकपणा ठेवला तर त्याला वेगळी धार येते. खारेपाटातील नाट्य संस्कृती टिकवली पाहिजे. भजन स्पर्धांचे आयोजन करुन ग्रामीण भागातील नाट्य संस्कृती शहरात गेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मते येतात जातात पण आपण केलेले काम कायम राहते. गेल्या काही वर्षात शेकापक्षाने अलिबाग तालुक्यात प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आता काम केले नाही तरी शेकापक्षाचाच आमदार येईल अशी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले.

शेकाप नेेते माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अलिबाग मतदारसंघात आपण प्रचंड निधी आणला. खारलँडसाठी 11 कोटींचा निधी मंजुर करुन आणला होता. मात्र ते काम थांबवण्यात आले आहे. माणकुले ते शिरवली साठी 10 कोटीचा निधी मंजुर केल्याचेही ते म्हणाले. शेकापक्षाने रायगडच्या कानाकोपर्‍यात काम केले आहे. जयंत पाटील यांच्यासारखा आमदार आहे म्हणून रायगडचे प्रश्‍न सभागृहात मांडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अलिबाग तालुका हा विचारांशी प्रामाणिक तालुका आहे कमिशन खाणारा नाही असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मनोगतात नागावमध्ये अत्याधुनिक असे क्रीडा संकुल उभारण्यात आले असून भविष्यात खारेपाटात देखील असे क्रीडा संकुल उभारण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तीन चार गावे मिळून क्रीडा संकुल उभारून या भागातील खेळाडून देशपातळीवर कामगिरी गाजवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. चित्रलेखा हिरामत यांनी आपल्या मनोगतात शिक्षणामुळे काहिही करता येते हा आत्मविश्‍वास मिळतो. नारंगी हे गाव मॉडेल असून सर्वांचे सहकार्य मिळाल्यास भविष्यात आणखी सर्वतोपरी मदत आपल्या कुटूंबाकडून केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रस्तावना माजी उपसभापती अनिल पाटील यांनी केले. निवेदन वेदांत कठंक यांनी केले. कार्यक्रमासाठी गाव अध्यक्ष प्रमोद पाटील, रांजणखार गाव अध्यक्ष संजय पाटील, नरेश म्हात्रे, सविता धुमाळ, शिल्पा म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, अनिल धुमाळ, राहूल पाटील, स्वप्निल म्हात्रे, माजी सरंपच विनोद पाटील, मंगेश म्हात्रे, वर्षा पाटील, अमृता म्हात्रे आदींनी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.